अनंत जाधव- सावंतवाडी -गोव्याला जोडणाऱ्या तळवणे-वेळवेवाडी पुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहत असतानाच कामाचे रेखाचित्र चुकल्याने पुलाची वेल तोडावी लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत ४० टक्केच पुलासह रस्त्याचे काम पूर्ण झाले असून ठेकेदारावर मेहरबान होत अधिकाऱ्यांनी तब्बल ६० टक्के निधी ठेकेदारांना दिल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ज्या महिन्यात कामाचे भूमिपूजन झाले त्याच महिन्यात कामाचे पैसे देण्यात आल्याचेही पुढे आले आहे. हे सर्व करीत असतानाही अद्यापपर्यंत बांधकाम विभागाच्या ताब्यात ही जागाच नसल्याचे पुढे आले असून मग एवढा निधी खर्ची कसा पडला? असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.तळवणे-वेळवेवाडी या किनळेसह सातोसे, मडुरा या रस्त्याचे भूमिपूजन १६ मार्च २०१३ मध्ये तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले होते. या कामाचे अंदाजपत्रक सावंतवाडीचे निवृत्त कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी घाईगडबडीत करीत २ कोटी ७० लाखाच्या कामाला मंजुरी घेत निविदाही काढली होती. यात पूल २५ मीटर लांबीचे तर पुलाला जोडणारा रस्ता हा १ किलोमीटर लांबीचा आहे. त्यांची अंदाजपत्रकीय किंमत ६५ लाख रूपये एवढी आहे. तर पुलाची किंमत २ कोटी ५ लाखांपर्यंत जात आहे. त्यामुळे बांधकाम विभाग जनतेचा की ठेकेदाराचा? असा प्रश्न उपस्थि होवू लागला आहे. तत्कालीन बांधकाममंत्र्यांनी ज्या पुलाचे भूमिपूजन केले, त्या कमाचे भूसंपादनही करण्यात आले नसून तब्बल ३० शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात करीत त्यांना तसेच ठेवण्यात आले आहे. सध्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असला तरी त्यांचे भूसंपादनच झाले नसून शासकीय कामच अवैधरित्या सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.तत्कालिन अधिकाऱ्यांनी जाता जाता धनादेश दिले--तळवणे पूल झोल भाग १तळवणे वेळवेवाडी पूल पूर्वीच चर्चेत असून हे काम ४० टक्के पूर्ण होण्याआधीच त्यावर ७० टक्के निधी खर्ची पडला असून सध्या बांधकाम विभागाकडे ६० लाखाचा निधीच शिल्लक आहे. मग बांधकाम विभाग स्वत: जवळ अनामत रक्कम काय ठेवणार आणि पुढील कामावर किती निधी खर्च करणार? असा सवाल पडला असून प्रत्येक कामाची अनामत रक्कम ठेवणे बंधनकारक असते.तळवणे वेळवेवाडी पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे निविदा भरल्यानंतर लगेचच पैसे देण्यात आले आहेत. तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी निवृत्त होण्यापूर्वी तर उपविभागीय अभियत्याने बदली होण्यापूर्वी धनादेश दिल्याची चर्चा आहे.
‘तळवणे’ पुलासाठी अधिकारीच ठेकेदारावर मेहरबान
By admin | Published: October 20, 2015 9:25 PM