बांदा : माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्राला सोमवारी रात्री उशीरा भेट दिली. यावेळी शेकडोंच्या संंख्येने गोळा झालेल्या ग्रामस्थांनी वनविभाग व पशुधन विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांसमक्षच धारेवर धरले. अखेर केसरकर यांनी ग्रामस्थांची बाजू जाणून घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. निष्काळजी, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देत केसरकर यांनी जिल्हाधिकारी यांना रोजच्या रोज पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. तसेच येत्या चार दिवसांत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देत आपण पुन्हा शनिवारी येऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. माकडतापाच्या साथीने थैमान घातले असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी पशुुधन उपायुक्त डॉ. पठाण हे प्रथमच बांद्यात आल्याने स्थानिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रामस्थ व बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्यातदेखील शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. या परिसरात आलेले माकडतापाचे संकट दूर करुया, असे आवाहन केसरकर यांनी केले. तसेच अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पााकमंत्री दीपक केसरकर हे प्रथमच बांद्यात आले होते. येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राला त्यांनी उशीरा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी, सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी जंगम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, पशुधन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच बाळा आकेरकर उपस्थित होते. यावेळी सचिन वीर, गजानन गायतोंडे, गुरुनाथ सावंत, समीर कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिक आणि अधिकाऱ्यांमध्ये झाली बाचाबाचीयावेळी आनंद वसकर यांनी परिसरात आतापर्यंत शेकडो माकडे मृत होऊनही वनखाते पंचनामा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. वनविभाग व पशुसंवर्धन विभागाने याचे स्पष्टीकरण द्यावे असे सांगितले. तसेच प्रशासनाच्या ढिम्म धोरणामुुळेच दोघा युवकांचा बळी गेल्याने स्थानिकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. परिसरात ३00 हून अधिक माकडे मृत होऊनही वनखाते केवळ ३४ माकडे मृत झाल्याचे सांगत असल्याचा आरोप केला. यावेळी कर्मचारी कमी असल्याचे कारण सुभाष पुराणिक यांनी दिले. त्यावेळी केसरकर यांनी मृत माकडांची विल्हेवाट लावण्यासाठी व सर्वेक्षण करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे ५0 जणांचे पथक देण्याचे जाहीर केले. तसेच विशेष आरोग्य पथक साथ बाधीत परिसरात नेमण्याचे आदेश दिले. गोवा येथे पाठविण्यात येत असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक हे २४ तास कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण स्वत: बांबुळी येथे जाऊन चर्चा केल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच माकडतापाचे संकट मोठे असल्याने याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. पशुुधन अधिकारी डॉ. जाधव हे उपस्थित नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पशुधन उपायुक्त डॉ. पठाण यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना स्थानिकांनी चांगलेच धारेवर धरले. त्यांच्याकडून दररोज बाधीत परिसरात भेट देण्याचे लेखी आश्वासन घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते व स्थानिकांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. मात्र काही ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण मिटविण्यात आले.पालकमंत्र्यांनी भेट दिल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती.गरज पडल्यास संपूर्ण बांदा शहरात फवारणीआतापर्यंत बाधीत रुग्णांची संख्या ही ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.गरज पडल्यास संपूर्ण बांदा शहरात फवारणी करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत.साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.यामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी सामोरे जा, असा सज्जड इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी उपस्थितांना दिला. पशुधन खात्याने जनावरांचे गोठे व परिसर निर्जंतुकीकरण करण्यावर भर द्यावा असे बजाविले.रुग्णांच्या रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. त्याचा अहवाल कमी कालावधीत मिळण्यासाठी आपण मणिपालच्या वैद्यकीय पथकाशी चर्चा करू.मणिपाल येथील रक्त तपासणी लॅबची माहिती घ्या.अशा अनेक सूचना केसरकर यांनी आरोग्य विभागाला यावेळी केल्या. गोवा येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी आरोग्य विभागाकडून २४ तास पथक कार्यरत आहे. आपण स्वत: बांबुळी येथे जात याबाबत माहिती घेतल्याचे केसरकर यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांकडून अधिकारी फैलावर
By admin | Published: March 07, 2017 10:47 PM