रत्नागिरी : शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) विभागात विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारासह घाऊक प्रमाणात राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या नव्या नेत्या-कार्यकर्त्यांना आता शांत बसणे कठीण जात आहे. त्यामुळे राजकीय पुनर्वसन कधी होणार, याकडे हे नवीन कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. त्यातूनच नवे व जुने कार्यकर्ते यांच्यातील वाद उफाळून आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. दुसऱ्या पक्षाचे आमदार कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. त्यांना पक्षात घेण्यावरून सुरूवातीलाच जुन्या नव्यांमध्ये कलगी-तुरा रंगला होता. त्यानंतर हा वाद वाढतच गेला असून, आता शिवसेनेत येताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असा लकडा या नव्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे धरला आहे. त्यामुळे शिवसेनाअंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नव्या - जुन्यांच्या या वादात रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी तसेच उपजिल्हाप्रमुखपदी असलेल्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. अन्य काही पदांसाठीही नवीन गटातील कार्यकर्ते आग्रही असून, त्याबाबत जाहीररित्या बोलले जात आहे. त्यामुळे नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला आहे. लाभ कोणाला होणार व या वादात कोणाचे हात भाजणार, या चर्चेला उधाण आले आहे.नवीन गट शिवसेनेत आल्याने सेनेची मतदारसंघातील ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रथमच लढल्या गेलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने नवीन-जुने कार्यकर्ते यांच्यात धूसफूस सुरू आहे. आता खूप वेळ झाला आहे. अजून किती वाट पाहायची, असा सवाल नवीन कार्यकर्ते नेत्यांना करीत आहेत. कार्यकर्त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर न झाल्यास अन्य पक्षाची वाट धरण्याची ‘प्रेमळ’ धमकीही दिली जात असल्याने नेतेही अस्वस्थ आहेत.नव्याने शिवसेनेत आलेल्या शिवसैनिक व त्यावेळच्या पक्षपदाधिकाऱ्यांचा डोळा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर आहे. उपजिल्हाप्रमुखपदावर सध्या राजेंद्र शिंदे असून, त्या पदावर राजेश सावंत यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न आहेत. तर तालुकाप्रमुखपदासाठीही नवीन गटाचे गजानन पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. रत्नागिरी शहर प्रमुखपद रिक्त असून, बिपीन बंदरकर यांच्या नावाचा विचार होत असला तरी जुन्यांमधील प्रशांत साळुंखेंच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा शिवसेनेअंतर्गत ‘जुने-नवे’ वाद उफाळला!
By admin | Published: May 24, 2015 11:19 PM