कणकवली : देशाचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमात काँग्रेसची सत्ता आली तर भारतामध्ये जी आरक्षण व्यवस्था आहे, ती संपवून टाकू, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या प्रवृत्तीचा आणि विचाराचा आम्ही विरोध करणार आहोत. त्यामुळे कणकवली येथे भाजपा, शिंदेसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीच्या पक्षांच्यावतीने ५ ऑक्टोबरला आरक्षण बचाव रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, भाजप अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, किरण जाधव, भाजपा मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार जो आरक्षणाचा हक्क दिलेला होता, तो संपूर्ण संपुष्टात आणण्याचे काम राहुल गांधींनी केलेले आहे. वर्षानुवर्षे आमचा हा समाज या हक्काने वावरतो आहे. शिक्षण, नोकरी आणि विविध स्तरांमध्ये त्यांना जो अधिकार मिळतो आहे, तो काढून घेण्याचे आणि आरक्षण संपवण्याचे काम राहुल गांधींच्या काँग्रेसच्या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे जेव्हा असा प्रयत्न होईल, तेव्हा त्याला तीव्र विरोध केला जाईल.आरक्षण हा आमचा हक्क आहे. आणि या हक्कासाठी येणाऱ्या ५ ऑक्टोबरला कणकवली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय व महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून आरक्षण बचाव रॅली काढण्यात येईल. सकाळी १० वाजता जानवली पूल येथून रॅलीला प्रारंभ होईल. तेथून शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या येथे रॅली पोहचल्यावर तिथे अभिवादन केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सर्व एकत्र जमू. आमचे एक शिष्टमंडळ कणकवली प्रांताधिका-यांना निवेदन देईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे..
महायुतीच्यावतीने कणकवलीत ५ ऑक्टोबरला आरक्षण बचाव रॅली, नितेश राणेंनी दिली माहिती
By सुधीर राणे | Published: September 26, 2024 5:07 PM