सावंतवाडी : मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. तपास कार्यात कोणताही अडथळा आणला नाही. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. मला अटक केली नाही तर मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो. हे सरकार मला अटक करु शकले नाही. या सर्व प्रकरणावर मी बोलणार आहे. ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मात्र अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.जात मुचलक्यावर जामीन मंजूर होताच आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्गला रवाना झाले. जामीन अर्जाची पूर्तता करण्यासाठी ते सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला.यावेळी राणे म्हणाले, कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे? राजकारणाचा स्तर खालावला आहे यावरही विचार करावा. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोवा निवडणुकीत माझ्यावर जबाबदारी होती मात्र तेथेही मी जावू शकलो नाही. त्यामुळे तब्येत सांभाळून मी कामाला लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापुरच्या रुग्णालयातून सुट्टी घेतली असली तरी, यानंतर मी माझ्या वैद्यकीय रुग्णालयात जाणार आहे, तिथे मी दोन दिवस रुग्णालयात दाखल होणार आहे, त्यानंतर काही उपचारांसाठी मी मुंबईला जाणार आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपचारा दरम्यान माझ्यावर आरोप होत होते की, हा राजकीय आजार आहे. न्यायलयीन कोठडी होती म्हणून याने राजकीय आजार काढले आहेत. चला आपण एक मानू की नितेश राणे खोटं बोलतोय, त्याला तुरुंगात जायचं नाही. पण माझी जी वैद्यकीय तपासणी व्हायची, जे काय माझे रिपोर्ट काढले होते ते देखील काही खोटे होते का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.