कणकवली : सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या तपासणीत धान्यामध्ये तफावत आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक नितीन शंकरदास डाके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून दोघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सुमित देवानंद मयेकर (३८) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.सांगवे येथे धान्य पिकअप टेम्पोतून अन्यत्र हलविण्यात येत असताना मंगळवारी काही ग्रामस्थांनी संशयितांना पकडले होते. त्यानंतर तातडीने महसूल पुरवठा विभागाला कळविण्यात आले. त्यावेळी पुरवठा अधिकारी नितीन डाके, मंडळ अधिकारी डी. एम. पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर चौकशी करून रास्त दराच्या धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली.या तपासणीत अनियमितता आढळून आली. त्यामुळे डाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२० रोजी सेल्समन सुनील हरी तोरस्कर याच्या ताब्यातील रास्तभाव धान्य दुकान सांगवे मधील तपासणीत अंदाजे रुपये ५१,६४४ किमतीच्या धान्यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. तसेच वाहन क्रमांक एम. एच. ०७-ए. जे. १६४६ मध्ये धान्य आढळून आले.
वाहनचालक सुमित देवानंद मयेकर (रा. जामसंडे, देवगड ) यांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी ८२००० रुपयांची २४.८५ क्विंटल तांदूळ असलेली ५१ पोती मुद्देमालासह पंचनामा करून ताब्यात घेतली आहेत. तसेच चारचाकी वाहन चालक सुमित देवानंद मयेकर व सेल्समन सुनील हरी तोरस्कर यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.