कणकवली : तालुक्यातील आंबा-काजू नुकसानभरपाई वाटपाची प्रक्रिया धिम्यागतीने सुरू आहे. तरीही आतापर्यंत १ कोटी ५ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. तालुक्यात एकूण नुकसानीचा आकडा सहा कोटी रुपये आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईचे वाटप करताना अनेक अडथळे येत आहेत. सुरुवातीला कृषी विभागकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादीच महसूल विभागाकडे न पोहोचल्याने विलंब झाला होता.तालुक्यात नुकसान झालेले एकूण ७०४६ खातेदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ११४६ खातेदारांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली आहे. कृषी खात्याकडून ही यादी महसूल विभागाकडे पोहोचल्यानंतर नुकसानभरपाई वाटपाच्या कामाने थोडी गती घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. आंबा तसेच काजू बागायतदारांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले होते. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे बागायतदारांना तसेच शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आंबा तसेच काजू नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल तसेच कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
फळउत्पादकांना एक कोटी वाटप
By admin | Published: October 18, 2015 10:36 PM