कणकवली: कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभाग आणि( IQAC)अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने १८ एप्रिल २०२१ रोजी 'सामाजिक शास्त्रातील अत्याधुनिक अभ्यास प्रवाह' या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई- परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेत जगभरातून अभ्यासक आणि संशोधक सहभागी होऊन निबंध वाचन करणार आहेत. तसेच निवडक शोध निबंध नामांकित अशा शोध मासिकातून प्रकाशित करण्यात येणार आहेत.ही परिषद आंतरविद्याशाखीय असून अभ्यासकांना साहित्य, वाणिज्य,विज्ञान व सामाजिक शास्त्रातील वेगवेगळ्या उपघटकांवर आधारित शोधनिबंध सादर येतील अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्य संयोजक डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी दिली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बीजभाषक म्हणून श्रीलंका येथील सुप्रसिध्द संशोधक आणि भारतीय - श्रीलंकन संस्कृतीच्या अभ्यासिका,श्रीमती सुभाषिनी पदमनाथन यांचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मसुरी येथील जेष्ठ समाज शास्त्रज्ञा मेरी सायमन लुईकी या परिषदेत सामाजिक शास्त्रे,विज्ञान व भाषेचे अनुबंध या विषयावर व्याख्यान देतील. याबरोबरच बेंगलोर येथील 'नॅक'या राष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार विनिता साहू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.शामराव कोरेटी या परिषदेत सत्राध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत.या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, चेअरमन पी.डी.कामत,सचिव विजयकुमार वळंजू यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या एकदिवशीय परिषदेत देशभरातील अभ्यासक , संशोधकांचे दोन सत्रात शोध निबंध वाचन होणार असून परिषदेचे समन्वयक म्हणून डॉ.एस.एन.पाटील व डॉ.राजेंद्र मुंबरकर,सह समन्वयक प्रा.युवराज महालिंगे, संयोजन सचिव डॉ.सोमनाथ कदम आणि सह सचिव म्हणून डॉ. बी.एल.राठोड हे परिषदेची जबाबदारी सांभाळत आहेत.
कोकणात कणकवली सारख्या ग्रामीण भागात अशा पध्दतीने विविधांगी विषयावर होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेस उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्व अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक,व विद्यार्थी संशोधकांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य संयोजक तथा प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले आहे.