सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सरमळे नेवली येथील जंगलात काजरयाच्या टेंब येथे शुक्रवारी सकाळी गवा मृतावस्थेत आढळून आला. गव्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र दोन गव्यांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.सावंतवाडी तालुक्यातील सरमळे असनिये येथील जंगलात गेल्या काही दिवसापासून गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. मध्यंतरी तर एक गवा जखमी अवस्थेत हिंसक ही बनला होता. त्यांच्यावर येथील वनविभागाकडून उपचार ही करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा एक गवा मृतावस्थेत सरमळे नेवली येथील जंगलात आढळून आल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली.त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यात वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्यासह वनपाल अनिल मेस्त्री वनरक्षक शशीकांत देसाई आदीचा समावेश होता. त्यानी घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.रामचंद्र तेली यांच्या उपस्थितीत या गव्याचे शवविच्छेदन केले. मात्र उशिरापर्यंत मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
झुंजीतूनच मृत्यू झाला असावा असे मत स्थानिकांकडून व्यक्त केले. त्याला वनविभागाकडून दुजोरा देण्यात आला. पशुवैद्यकीय अहवाल आल्यानंतर आपण माहिती देऊ असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान दुपारच्या सुमारास मृत गव्यावर वनविभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.