कुडाळ : वेताळबांबर्डे येथील महामार्गावर बुधवारी रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात ओरोस येथील मल्लापा लमाणी यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.या अपघाताबाबत कुडाळ पोलिसांनी माहिती दिली की, या अपघातातील मृत मल्लापा लमाणी हा मूळ कर्नाटक येथील असून तो बांधकाम कामगार होता. सध्या तो ओरोस येथे राहत होता. बुधवारी सावंतवाडी तालुक्यातील एका घराचे बांधकाम करून सायंकाळी उशिरा ओरोसच्या दिशेने येत होता.त्याच्या मागे दुचाकीवर ओरोस येथील पोलीस कर्मचारी नवलू कोकरे हे बसले होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वेताळ बांबर्डे पुलावरून जात असताना समोरून जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची धडक समोरून येणाऱ्यां दुचाकीला बसली. या अपघातात मल्लापा व कोकरे हे दोघेही खाली फेकले गेले.
यामध्ये मल्लापा गंभीर जखमी झाले तर कोकरे किरकोळ जखमी झाले. या अपघातादरम्यान तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून मल्लापा याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.
प्राथमिक तपासात मल्लापा याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, जीवितास धोका निर्माण होईल अशाप्रकारे दुचाकी चालवित ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मृत मल्लापा याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.