भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गावर भुर्इंज नजीक रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका कारला आरामबसने पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील एकजण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. मृत व जखमींमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून जखमींवर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भुर्इंजनजीक एका कारचा (एमएच ०४ डब्लू ४९३९) टायर पंक्चर झाला. पंक्चर काढण्यासाठी कार महामार्गावर रस्त्याकडेला उभी होती. कारची दुरुस्ती सुरू असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आरामबसने (एमएच ०४ एफके ९९२९) कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पराग गणपती गुंजाटे (वय ५३, रा. जामसंडे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हे जागीच ठार झाले. सुनील राजाराम पांगम, रविकांत विष्णू मिस्त्री, प्रमोद राजाराम ठाकूर, शिवाजी दत्तात्रय मडवळ (सर्व, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) गंभीररीत्या जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत पराग गुंजाटे यांचे शवविच्छेदन भुर्इंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. दरम्यान, अपघातातील मृत व जखमी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. (वार्ताहर)
बस-कार अपघातात एक ठार
By admin | Published: June 22, 2015 10:16 PM