सिंधुदुर्ग : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फतमराठा समाजाच्या तरुणांना देण्यात येणारे कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी जामिनाची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करतानाच 'एक मराठा, लाख मराठा' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या महामंडळामार्फत राज्यात एक लाख मराठा उद्योजक निर्माण करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाच्या योजनांचा मेळावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, मराठा युवकांना स्वयंरोजगाराचे दालन खुले करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळास भरघोस निधी देऊन राज्य सरकारने पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करन दिली आहे. या मंडळामार्फत ३ योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा दौऱ्यावर येऊन आपण या महामंडळाच्या योजनेचा आढाव घेतला असता जिल्ह्यात या योजना प्रचार झाला नसल्याचे दिसून आले . केवळ २९८ लोकांनी सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) महामंडळाकडून घेतले आहे. यात ५३ लोकांना कर्ज मंजूर झाले असून ५१ जणांना व्याज परतावा सुरु झाला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे लाभाथ्यांशी चर्चा करताना, कर्ज देताना बँकांकडून सरकारी जामीनदार हवा अशी सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र, या महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी जामिनाची आवश्यकता नाही. तशा सूचना सर्व बँकांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात महामंडळाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांत तालुकावार नियोजन करून लाभार्थी संख्या वाढविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी एक जिल्हा समन्वयक देण्यात आला आहे. जसजसे लाभार्थी वाढत जाणार तसे समन्वयकही जास्त दिले जाणार आहेत. 'एक मराठा, लाख मराठा' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजाच्या तरुणांना कर्ज देऊन राज्यात एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्यात येणार आहेत, असे यावेळी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.