वैभववाडी : आचिर्णे येथील प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ (५८) यांच्या रेल्वेतून चोरलेल्या पर्समधील आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाइलचा वापर करीत अज्ञात चोरट्याने बँक खात्यातून एक लाख रुपये काढले. याशिवाय पर्समधील १२ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ही पर्स दि. २४ जूनला तुतारी एक्स्प्रेसमधून चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्याविरोधात वैभववाडीपोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.आचिर्णे पिंपळवाडी येथील प्रिया ज्ञानेश्वर सकपाळ व त्यांचे पती दि. २४ जूनला तुतारी एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातून दादर ते वैभववाडी असा प्रवास करीत होते. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास दरम्यान प्रिया संकपाळ टॉयलेटला गेल्या असताना सीटवर ठेवलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार पतीला सांगितल्यावर दोघांनी आजूबाजूला सर्वत्र शोधा शोध केली. मात्र पर्स आढळून आली नाही.त्या पर्समध्ये मोबाइल तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड व मतदान कार्ड होते. मोबाइल चोरीस गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वैभववाडी येथील बँकेच्या शाखेत गेल्या. त्यांनी आपले बँक खात्यातून आर्थिक व्यवहार तूर्तास बंद करण्याची विनंती त्यांनी व्यवस्थापकांना केली. परंतु व्यवस्थापकांनी खात्याची तपासणी केली असता खात्यातून एक लाख रुपये अगोदरच काढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रिया संकपाळ यांना धक्काच बसला. पर्समधील मोबाइल व कागदपत्रांचा आधार घेत अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये गायब केले असावेत असा अंदाज आहे.यांसदर्भात संकपाळ यांनी मंगळवार, दि. २५ रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैभववाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
रेल्वेत चोरलेले आधार, पॅन वापरून बँक खात्यातील एक लाख काढले; वैभववाडी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:12 PM