कणकवली: कणकवली तालुक्यातील साळीस्ते गुरववाडी येथे अंगावर वीज पडून पांडुरंग नारायण गुरव-हेतकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.सध्या जोरदार परतीचा पाऊस बरसत आहे. शुक्रवारी सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने खारेपाटण, साळीस्ते, तळेरे, कासार्डे परिसरात अनेक भागात सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.साळीस्ते येथील पांडुरंग गुरव यांच्यावर वीज पडल्याने त्यांना तत्काळ त्यांचे कुटुंबीय तसेच शेजाऱ्यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी तपासणीअंती गुरव हे मृत झाल्याचे घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, जिल्हापरिषदेचे माजी सदस्य बाळा जठार, माजी उपसरपंच उदय बारस्कर, चंद्रकांत हरयाण, महेश गुरव, मयुरेश लिंगायत, चंद्रकांत गुरव, रवि गुरव, सूर्यकांत गुरव, अनंत गुरव यांच्यासह शेजारी व नागरीकांनी धाव घेत पाहणी करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कणकवली तहसीलदार आर.जे. पवार, तळेरे मंडळ अधिकारी नागावकर यांनी घटनास्थळी जात परिस्थितीची पाहणी केली. पांडुरंग गुरव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.
सिंधुदुर्ग: साळीस्ते येथे वीज पडून एकाचा मृत्यू, कणकवली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:39 PM