सावंतवाडी : सावंतवाडीत शुक्रवारी भरदिवसा महिलेला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील युवकाला ताब्यात घेतले आहे. कृष्णा विष्णू सावंत असे या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी सांगितले की, त्याच्यावर यापूर्वी चेन स्नेचिंगचे गुन्हे दाखल आहेत. प्राची वंजारी या महिलेनेही त्याला ओळखले आहे. या प्रकरणी दुसऱ्या युवकाच्या शोधासाठी पोलीस गोव्यात गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीत शुक्रवारी भरदिवसा प्राची वंजारी या महिलेचे वैश्यवाडा भागातील विचारे पाणंदनजीक दोघा युवकांनी मंगळसूत्र व मुहूर्तमणी मिळून दीड लाखाचे दागिने लुटले होते. या प्रकरणी वंजारी यांनी सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली होती. वंजारी यांनी दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी रात्री उशिरा कृष्णा सावंत या युवकाला ताब्यात घेतले आहे. कृष्णा सावंत हा कुडाळ येथील एका शोरूममध्ये कामाला असून, तो दुपारच्यावेळी शोरूममध्ये नव्हता. तसेच तो देत असलेली उत्तरेही समाधानकारक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कृष्णा याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्राची वंजारी यांना दाखविले असता, त्यांनी हाच युवक असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या युवकाने आपणास पुडी दिली. तर हा युवक बाजूला थांबला होता, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कृष्णाबाबतचा संशय बळावला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंभाले करीत आहेत. (प्रतिनिधी)
दागिने चोरीप्रकरणी एकजण ताब्यात
By admin | Published: February 15, 2015 12:35 AM