आचरा : आचरा समुद्रात संशयास्पद बोट फिरत असल्याच्या माहितीवरून एकच खळबळ उडाली. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आचरा पोलिसांना आचरा समुद्रात संशयास्पद बोट फिरत असल्याचा दूरध्वनी येताच आचरा पोलिसांची तारांबळ उडाली. लगेचच आपल्या ताफ्यातील शस्त्रधारी पोलिसांसह आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी आचरा किनाऱ्याचा ताबा घेत किनारपट्टी सील केली व संशयित फिरणारी बोट अथक प्रयत्नाने ताब्यात घेतली. ही मोहीम आपत्कालीन सागरी सुरक्षा मोहीम असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.अलिकडेच विजयदुर्ग बंदरावर संशयास्पद बोट आढळून आली होती. या धर्तीवर आपल्या कोस्टल भागात कोणताही अतिरेकी हल्ला होऊ नये, अतिरेकी हल्ल्यापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून अतिरेकी कारवाई विरोधात आपले कर्मचारी, सागर सुरक्षा दल, नागरिक, मच्छिमार, इतर सरकारी यंत्रणा किती सहकार्य करते यातूनच सागर किनारपट्टीवर सशक्त बंदोबस्त आहे याची परीक्षा घेण्यासाठी ही आपत्कालीन सागरी सुरक्षा मोहीम राबविण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.आचरा पोलिसांची तत्परतासंशयास्पद बोटीची माहिती मिळताच आचरा पोलिसांनी पूर्ण किनारा सील केला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात होती. समुद्रात फिरणाऱ्या संशयास्पद बोटीवर आचरा पोलिसांनी ताबा मिळवत आतील संशयितांना ताब्यात घेतले. संशयित हे आचरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व सागर सुरक्षा रक्षक असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी काही काळासाठी आचरा परिसरातील वातावरण भीतीदायक बनले होते. या मोहिमेत आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, विद्याधर निवतकर, अशोक सावंत, दर्शना पालकर, हनुमंत बांगर, सुशांत पवार, उदय शिरगांवकर, मधुकर पानसरे, जयसिंग तडवी, राजेश गवस, मृणालिनी सावंत, एन. बी. कोचरेकर, सागर सुरक्षा रक्षक किशोर केळुसकर, शैलेश सारंग आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. (वार्ताहर)मच्छिमारांचे आभारआचरा पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मासेमारीला जाणाऱ्या बोटीतील मच्छिमारांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांनी होत असलेल्या तपासणी कार्यात सहकार्य दाखविले. सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, मच्छिमारांचे सागर सुरक्षा रक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे शिंदे यांनी आभार मानले.
संशयास्पद बोटीने एकच धावपळ
By admin | Published: May 21, 2015 11:10 PM