कणकवली : खारेपाटण येथील युवकाला दुचाकी विकत देतो असे सांगून एका भामट्याने ५१,६०० रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे. याबाबत त्याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.खारेपाटण कर्लेवाडी येथील सूरज दामाजी गुदळे (२३) या युवकाने ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोबाईलमध्ये फेसबुकवर जुनी दुचाकी विकायची असल्याची एक जाहिरात पाहिली. त्याला गाडीची गरज असल्याने त्याने संबंधित जाहिरातीमधील (एम.एच.०९, इबी-०६११) या क्रमांकाच्या दुचाकीवर क्लिक केले.जाहिरातीमध्ये त्या दुचाकीची किंमत २०,१०० रुपये इतकी होती. त्यानंतर जाहिरात देणाऱ्याने मेसेंजरवर सूरज याला त्याचा मोबाईल नंबर पाठविला. त्यावर सूरज याने लगेच संपर्क केला. मात्र, त्यावेळी त्या व्यक्तीने फोन घेतला नाही. सायंकाळी ४.०७ वाजण्याच्या सुमारास सूरज याला फोन करून हिंदीतून संवाद साधला. त्यावेळी गाडीची किंमत २०,००० रुपये सांगितली. परंतु सूरज याने १५,००० रुपयाला दुचाकी मागितली. त्यानंतर त्या व्यक्तीने दुचाकीचे कागदपत्र व्हॉट्सअॅपवर टाकले. त्यात गणेश खामकर असे नाव नमूद होते.त्यानंतर त्या व्यक्तीने गाडीसाठी ३,००० रुपये अॅडव्हान्स पाठवा असे सांगून गुगल पे वर मेसेज केला. सूरज याने पैसे पाठविल्यावर वाहतूक खर्च म्हणून २,००० रुपये पाठवा असे सांगितले. सायंकाळी ६.११ वाजता २००० रुपये पाठविले. तसेच त्यांना फोन करून गाडी केव्हा पाठविणार असे सूरज याने विचारले. त्यावेळी उद्या सकाळी १० वाजता गाडी येणार असे त्याने सांगितले .त्यानंतर २ सप्टेंबर रोजी सकाळी ८.५२ वाजता फोन करून हिंदीतून आर्मी पोस्टमन बोलतोय. वारगावजवळ आलो आहे, असे सांगितले. तसेच तुमचे पार्सल लॉगीन करण्यासाठी उरलेले १०,००० रुपये पाठवा असे सांगितले. सकाळी ९.१२ वाजता १०,००० रुपये सूरज याने पाठविले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्मी पोस्टमनचा फोन आला. त्याने पुन्हा सोकोटो चार्जेस ९,१५० रुपये भरावे लागतील. त्यातील ५० रुपये कट होतील. तसेच ९,१०० रुपये गाडी दिल्यानंतर जागेवर परत करतो, असे सांगितले. त्यामुळे परत पैसे पाठविले.टप्प्याटप्प्याने ५१ हजार पाठविलेटप्प्याटप्याने ५१ हजार ६०० रुपये गुगल पेने पाठविले. मात्र, दुचाकी काही मिळाली नाही. त्यामुळे सूरज याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबत तक्रार नोंदविली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दुचाकी विकत देण्याच्या बहाण्याने आॅनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 5:59 PM
खारेपाटण येथील युवकाला दुचाकी विकत देतो असे सांगून एका भामट्याने ५१,६०० रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे. याबाबत त्याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
ठळक मुद्देदुचाकी विकत देण्याच्या बहाण्याने आॅनलाईन गंडाखारेपाटण येथील युवकाची फसवणूक : ५१,६०० रुपये केले लंपास