सावंतवाडी : कोकणातील पर्यटन विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा. त्या आराखडा नुसार विकास करण्यासाठी मी पर्यटन व्यवसायायिक महासंघासोबत असेन असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. ते ऑनलाईन चर्चासत्रात बोलत होते.
प्रभू यांच्या हस्ते महासंघाच्यावतीने सिंधुदुर्ग पर्यटनाची महिती पन्नासहून जास्त भाषांमध्ये तयार केलेल्या वेबसाईटचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारत सरकारचे प्रादेशिक संचालक वेंकटेशन यांच्यासह निला लाड, जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते.प्रभू म्हणाले, सिंधुदुर्गातील काही अनुभवी व जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते एकत्र येवून निसर्गसंपन्न कोकणातील पर्यटन चळवळीसाठी रचनात्मक काम करत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असून जिल्ह्यातील लोकांनी मला उदंड प्रेम दिल. त्यांच्याच आशिर्वादाने मी केंद्रीय मंत्री म्हणून अनेकदा काम केल. मला मिळालेल्या अधिकाराचा आपल्या जन्मभूमीच्या विकासासाठी उपयोग करून मंत्री असताना कोकण रेल्वेच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली तसेच पर्यटनाला आवश्यक मुलभूत सुविधा, विमानतळ अशा विषयांना प्राधान्य देवून काम केले.या ऑनलाईन कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे संचालक दिपक हर्णे, उदय कदम, जिल्हा उपाध्यक्ष डि. के. सावंत, सावंतवाडीचे अध्यक्ष जितेंद्र पंडित, मालवणचे अध्यक्ष अविनाश सामंत ,किशोर दाभोलकर आदी उपस्थित होते. भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या निला लाड यांनी आपल्या अनुभवाचा फायदा या महासंघाला निश्चितच करून दिला जाईल असे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासंघाचे सचिव ॲड. नकुल पार्सेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तर महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी महासंघाच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट केली. आभार महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांनी मानले.कोकणी माणूस संघटित झाल्यास जगावर राज्यप्रभू म्हणाले, कोकणी माणूस संघटीत झाला तर जगावर राज्य करू शकतो. आज कोकणच्या निसर्गाला आणि नैसर्गिक संपत्तीला पर्यटनाची जोड दिली तर जिल्हा सुजलाम सुफलाम होवू शकतो. आपल्या आज आणखीन एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय की आपल्या जिल्ह्याची ओळख ही जागतिक स्तरावर व्हावी यासाठी महासंघाने जगातील आणि इतर देशातील पन्नासहून जास्त भाषामध्ये कोकणातील पर्यटन स्थळाची माहिती देणारी वेबसाईट सुरू केली आहे.