वेंगुर्ले : ग्रामीण भागात पॉस मशीनसाठी आवश्यक इंटरनेट मिळत नसल्याने मशीन निरुपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाकडून आॅनलाईन विक्रीतूनच धान्य दुकानांना धान्यसाठा केला जातो. मात्र, आॅनलाईनमुळे धान्यसाठा कमी होत असल्याने ग्राहक व धान्य दुकानदारांचे नुकसान होते.त्यामुळे तालुक्यात पूर्ण क्षमतेचे इंटरनेट व सर्व्हर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आॅफलाईन धान्य वितरण करावे. तसेच आॅफलाईन धान्य वितरणाच्या आधारावर शासनाने दुकानांना धान्यसाठा द्यावा, असा ठराव पंचायत समिती सभेत करण्यात आला.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य यशवंत परब, श्यामसुंदर मुणनकर, मंगेश कामत, सिद्धेश परब, अनुश्री कांबळी, गौरवी मडवळ, साक्षी कुबल, प्रणाली बंगे तसेच गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या उपस्थितीत झाली.तालुक्यात अनेक ठिकाणी घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील काही घरे बंद आहेत तर काही भाड्याने दिली आहेत. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीच माहिती दिली नसल्याचे गौरवी मडवळ यांनी सभेत सांगितले.
याबाबत त्याचा सर्व्हे झाला असून लवकरच संबंधितांना नोटिसा काढणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुतार यांनी दिली. शिरोडा बसस्थानक येथील भिंतीच्या कामाचे काय झाले, या प्रश्नावर त्याची निविदा प्रक्रिया झाली असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंचायत समिती सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या सूचना व ठराव तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या सूचना व ठरावांबाबत पुढे कोणती कार्यवाही झाली, त्याची माहिती प्रशासनाने पुढील सभेत ठेवावी, असा ठराव अनुश्री कांबळी यांनी मांडला. याबरोबरच इतर विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.शिष्यवृत्ती परीक्षा मध्यवर्ती केंद्रावर घ्यावी!पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ले हायस्कूल, पाटकर हायस्कूल व मदर तेरेसा हायस्कूल येथे होतात. तालुक्यातील टोकाच्या भागातील शाळांच्या मुलांना २० ते ३० किलोमीटर प्रवास करून परीक्षेला यावे लागते. यात त्यांना आर्थिक भुर्दंड पडतो. त्यामुळे केंद्र्रबलगटातील मध्यवर्ती केंद्र्रावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जावी, असा ठराव मंगेश कामत यांनी मांडला.