कणकवली: कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत मागील वर्षी कणकवली तालुक्यातून विविध औजारांसाठी सुमारे १२९० प्रस्ताव प्राप्त झाले होते. कोरोनामुळे मागील वर्षी सोडत काढण्यात अडचणी आल्या. मात्र, आयुक्त स्तरावर झालेल्या ऑनलाईन सोडतीमध्ये यातील केवळ ११२ प्रस्तावांची निवड करण्यात आल्याने पंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच उर्वरित प्रस्ताव नाकारताना देण्यात आलेल्या कारणांची माहिती आम्हाला द्या. अशी मागणी केली.कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते.या सभेत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत किती प्रस्ताव मंजूर झाले? अशी विचारणा सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केली असता, १२९०प्रस्तावांपैकी ११२ लाभार्थ्यांची निवड झाल्याचे कृषी अधिकार्यांनी सांगितले. मग उर्वरित प्रस्तावांचे काय करणार? अशी विचारणा सदस्य गणेश तांबे यांनी केली.भातपिक विमा योजनेचा किती शेतकर्यांना फायदा झाला आहे? अशी विचारणा सदस्य मंगेश सावंत यांनी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा, काजू बागायतींच्या नुकसानीचे काय? अशी विचारणा केल्यानंतर कृषी विभागाशी संबंधित असलेल्या सर्वच प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेऊन त्याचा निपटारा केला जाईल असे सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले.पंचायत समिती सेसमधून शेतकर्यांना ताडपत्री वितरित केल्या जाणार असून त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत. असे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कोविड लसीकरणाचा आढावा घेताना तालुक्यात १८९९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १७०० जणांना कोविड लसीकरण झाले असून हे प्रमाण ९० टक्के इतके आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.तालुक्याचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये नळयोजना विशेष दुरूस्तीची १८ कामे, तात्पुरती पुरक नळयोजनेची २ कामे, नवीन विंधन विहिरी ६३, विहिर खोल करणे व गाळ काढणे २१ कामे अशा १०४ कामांसाठी १ कोटी ११ लाख ८७ हजाराचा प्रस्तावित आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.कणकवली तालुक्याचा विकास करताना लोकप्रतिनिधींबरोबरच अधिकारीही सहभागी व्हायला हवेत. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी एकत्रितपणे काम करत तालुक्याच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले.
कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षे शिल्लक असून या काळात प्रलंबित सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल असे मनोज रावराणे यांनी सांगितले. सभेत कणकवली तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.फक्त ४७ शेतकऱ्यांनाच मोबदलाभातपीक विमा योजनेमध्ये ३१३पैकी फक्त ४७ शेतकर्यांना मोबदला देण्यात आल्याने इतरांचे काय ? अशी विचारणा या सभेत सदस्यांमधून करण्यात आली. यावेळी कृषी विभागा अंतर्गत विविध प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश सभापती मनोज रावराणे यांनी दिले.