मेहरून नाकाडे-- रत्नागिरी --पावसाळ्यानंतरच्या प्रखर ऊन्हात कलमे जगविण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नव्हते. अशावेळी शासनाकडून ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. गतवर्षीपासून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. यावर्षी या योजनेंतर्गत ७६ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असून, ११ लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. परंतु, कोरडवाहू शेतीमुळे ठिबक सिंचनचा खर्च परवडेनासा झाला आहे. पाणवठ्याजवळ असणाऱ्या बागांना पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मात्र, पाण्याअभावी कातळावरील लागवडीचा प्रश्न होता. ही झाडे जगत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आर्थिक डोलारा पेलून शेतकऱ्यांनी बागांची निर्मिती केल्यानंतर या बागांना पाणीच मिळत नसल्याने नुकसानाला सामोरे जावे लागत होते. त्यावर शासनाने मार्ग काढून विहीर असलेल्या फळबागांसाठी ठिबक, तुषार सिंचन योजना अनुदानावर उपलब्ध करून दिली. गतवर्षीपासूून ही योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी आॅनलाईनद्वारे अर्ज सादर करण्यासाठी केवळ एक महिना वेळ देण्यात आली होती. त्यासाठी दि. ६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या काळात आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात होते. मात्र, शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करणे जमले नाही. शिवाय एक महिनाच वेळ असल्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातून एकही अर्ज या योजनेसाठी आला नव्हता. यावर्षी मात्र आॅनलाईनद्वारे ७६ अर्ज शेतकऱ्यांनी पाठवल्यामुळे त्यांना मान्यता देण्यात आली. यासाठी ११ लाख रूपयांचे अनुदानही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले.मात्र, डोंगरउताराच्या जागेमुळे विहिरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अंतर जास्त असल्याने पाणी नेण्यासाठी पाईपचा खर्चही वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. डोंगराळ भागात ठिबक सिंचन बसवणे फायदेशीर असले, तरी डोंगराळ भागात यासाठी अतिरिक्त खर्च होत असल्याने तो परवडत नाही. या योजनेंतर्गत सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. मात्र, ठिबक यंत्रणा बसविण्याचे प्रमाण ठरलेले असल्याने ही बाब अधिक खर्चिक बनली आहे. नारळ, आंबा, काजू आदी फळबागा तसेच याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या आंतरपिकाला ठिबक पध्दतीने पाणी देणे सोपे होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. सध्या पावसाळ्यानंतरही भाजीपाला तसेच फळभाज्यांची शेती केली जाते. बागायतीमधूनही आंतरपीक घेतल्याने ठिबक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे.फलोत्पादन जिल्हा : डोंगरासह, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडरत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर येथील फळबाग लागवडीस चालना मिळाली. येथील डोंगरावर, कातळावर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करण्यात आली. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा हा डोंगरदऱ्यांतून विभागलेला आहे. डोंगरउताराची जागा असल्याने या जागेची निगा राखण्यासाठी भरपूर खर्च असल्याने बँकेचे अर्थसहाय्य घेऊन शासनाच्या विविध अनुदानांचा लाभ घेत कलमबागा विकसित केल्या जातात. यामध्ये रस्त्यालगत, पाणवठ्यालगत असलेल्या क्षेत्रांना पाण्याची समस्या उद्भवली नाही. मात्र, कातळावरील बागांसाठी ठिबक सिंचन योजना अंमलात आणण्यात आली.
परवडत नसल्याने केवळ ७६ प्रस्ताव
By admin | Published: March 25, 2017 9:41 PM