मालवण : पकडलेल्या ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई झाली तरीही गेल्या काही महिन्यांत मच्छिमारांचे झालेले कोट्यवधीचे नुकसान द्यावे. यापुढे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारीस येणार नाही, असे परराज्यांतील त्या पर्ससीनधारकांनी सांगावे, त्यानंतरच पकडलेले ट्रॉलर्स व खलाशी सोडू, असा आक्रमक पवित्रा मालवण व देवगडच्या मच्छिमारांनी घेतला आहे. सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण वाढतच आहे. ते बेछूट मासेमारी करत आहेत. याविरोधात संघर्ष तीव्र करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्जेकोट बंदर येथे मंगळवारी जमलेल्या मच्छिमारांनी हा निर्णय घेतला.या बैठकीला मालवण तालुका ट्रॉलर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक तोडणकर, मेघनाथ धुरी, कृष्णनाथ तांडेल, हरी खोबरेकर, महेश देसाई, गोपी तांडेल, गंगाराम आडकर यासह कर्नाटक मलपी येथील पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सचे मालक, गिलनेट धारक मच्छिमार उपस्थित होते. किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या जाळ्यांच्या नुकसानीचा आकडा कोट्यवधी रुपयांपलीकडे जाईल. याची भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच राज्याच्या ४० वाव समुद्री हद्दीबाहेरच या हायस्पीडने मासेमारी करावी, असा पवित्रा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मत्स्य अधिकारी आनंद मालवणकर यांनाही मच्छिमारांनी फैलावर घेतले. मासळीसह चारही हायस्पीड ट्रॉलर्स पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यातील मासळी चोरीला गेलीच कशी? तुमची सुरक्षा यंत्रणा असताना हे झालेच कसे? असा सवाल करत सिंधुदुर्गच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या हायस्पीडना पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले. याची जबाबदारी शासनाची असताना मत्स्य विभागाने कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. असा आरोप करत मत्स्य विभागामुळे हे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप या बैठकीत मच्छिमारांनी केला. (प्रतिनिधी)ट्रॉलर्समालकांची विनवणी : मच्छिमारांचा इशारापकडलेल्या हायस्पीडच्या मालकांनी यापुढे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर येणार नाही, असे आमच्या राज्यातील मेंगलोर, मलपी बंदरात तशा सूचनाही दिल्या आहेत. चुकून ट्रॉलर्सवरील खलाशी किनाऱ्यावर आले असतील, तर आमच्या बोटी सोडा. यापुढे मासेमारी करताना तुमच्या किनारपट्टीवर येणार नाही, अशी विनवणी केली.देवगडचे मच्छिमार मात्र आक्रमक झाले. याआधी अशाच बोटी पकडल्या, तेव्हाही पुन्हा येणार नाही, असे त्यांनी सांगितले होते; मात्र, समुद्रात रोजच त्यांचा धुडगूस सुरु आहे. बोटी सोडवण्यासाठी आता विनवणी करता; मात्र आधी आमची भरपाई द्या आणि बोटी घेऊन जा, असा इशारा त्यांनी दिला.मच्छिमारांनी दिला वकील; निर्णयाची प्रतीक्षादरम्यान, पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलर्स मालकांनी दंडाधिकारी तथा तहसीलदार वनिता पाटील यांच्यासमोर वकिलामार्फत मंगळवारी ट्रॉलर्स मालकांची भूमिका मांडली. यावेळी मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे व मच्छिमारांचा एक प्रतिनिधी उपस्थित होता. दंडात्मक कारवाईनंतर आमची नुकसानभरपाई मिळेपर्यंत बोटी सोडू नये, असे सांगत आपली व मत्स्य विभागाची बाजू मांडण्यासाठी मच्छिमारांनी वकील दिला. मात्र, तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्याकडे या प्रकरणी बाजू मांडून पूर्ण झाली आहे, निकालासाठी हे प्रकरण आता बंद झाले आहे. त्यामुळे कोणतीही बाजू कायद्याच्या चौकटीत राहून ऐकून घेतली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यावर मच्छिमारांनीही आमचा विचार करून योग्य निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुनावणी दरम्यान मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत तहसील परिसरात मच्छिमारांची मोठी गर्दी होती.
...नंतरच ट्रॉलर्स, खलाश्यांची मुक्तता
By admin | Published: October 27, 2015 10:09 PM