निकेत पावसकर--नांदगाव --कोकणातील गणेशोत्सव हा इथल्या श्रद्धेचे प्रतीक तसेच कुटुंबातील अनेकांना एकत्र बांधून ठेवणारा विशेष सण. विशेषत: कोकणातील घरगुती गणेशोत्सवामुळे आजही अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या एकत्र असलेली दिसून येतात. कणकवली तालुक्यातील तळेरे बाजारपेठ येथील कल्याणकर कुटुंबाचा गणपती सुमारे ७५ कुटुंबांचा एकच महागणपती असून गेल्या आठ पिढ्या एकत्र गणेशोत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे यादरम्यान विविध कार्यक्रमांनी रात्री जागविल्या जातात.तळेरे बाजारपेठेत गेले असता कल्याणकर कुटुंबियांच्या घरात अनंत चतुर्दशीपर्यंत ओंकाराचे सूर ऐकायला मिळतात आणि परिसरात भक्तीमय वातावरण असते. या कुटुंबाचा एकच गणपती आहे. याबाबत दत्तात्रय कल्याणकर यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की, गोवा ते मुंबई या दरम्यानच्या कल्याणकर कुटुंबाचा एकच गणपती तळेरे येथील मूळ घरी आणला जातो. गेल्या आठ पिढ्या ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.कल्याणकर घराण्याचे मूळ घर तळेरे बाजारपेठ येथे आहे. जसजसे कुटुंब वाढले तसतसे नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाणे झाले व तिथेच स्थायिकही झाले. मात्र पहिल्यापासूनच अकरा दिवसांचा आमचा गणपती असून या गणपतीच्या दर्शनासाठी तळेरेसह गोवा, कारवार, बांदा, सावंतवाडी, कडावल, वेंगुर्ले, रत्नागिरी, महाड, पेण, पनवेल, मुंबई व नाशिक अशा विविध भागांतून कल्याणकर कुटुंबे येतात. सुमारे ३०० पेक्षा जास्त माणसे या कार्यक्रमाला उपस्थित असतात.गणेशोत्सवासह दसरा हाही सण कुटुंबीयांकडून एकत्रित साजरा केला जातो. या सणानिमित्त अनेकजण एकत्र येतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही प्रथा भविष्यातही अशीच सुरू ठेवली जाईल, असेही ते म्हणाले. या गणेशोत्सवाच्या काळात दररोज रात्री विविध संगीत, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम ठेवून रात्री जागविल्या जातात. वेगवेगळ्या ठिकाणची भजने, फुगड्या सादर केली जातात.कल्याणकर कुटुंबात व्यावसायिक व नोकरदार आहेत. मात्र, काहीही झाले तरी गणपती व दसऱ्याला प्रत्येकजण येऊन जातात. यानिमित्ताने दूरवरच्या नातेवाइकांचे येणे होते व त्यामुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होतात. सर्वत्र उत्साह असतो. गणेश चतुर्थी, गौरी व गणपती विसर्जनाला सर्व कुटुंब एकत्र आलेले असते. यामुळे गणेशोत्सवात आणखीन मजा येते.कल्याणकर कुटुंबाची साधारणपणे आठवी पिढीही गणेशोत्सवात तितक्याच उत्साहाने सहभागी होत साजरा करतात. या कुटुंबातील अनेकजण विविध भागात वेगवेगळे व्यवसाय व नोकरी करतात. मात्र, गणेशोत्सव व दसरा या दोन सणांना सर्वजण आवर्जून तळेरे येथील मूळ घरी येतात. आजही आमचे कुटुंब एकत्र येते. अलीकडे विभक्त कुटुंब पद्धत अवलंब करणारी अनेक कुटुंब समाजात पाहावयास मिळतात. अशा कुटुंबांनी एकत्रित सण साजरे करणाऱ्या कल्याणकर कुटुंबांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.कल्याणकर कुटुंबातील बापू कल्याणकर, दत्तात्रय कल्याणकर, उल्हास कल्याणकर, दशरथ (बाबू) कल्याणकर यांच्यासह कल्याणकर कुटुंबातील महिलाही गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होतात. तरुण पिढीचा उत्साही सहभागगेले अकरा दिवस कल्याणकर कुटुंबात असंख्य सदस्यांचा राबता सुरु असल्याचे यानिमित्ताने पहायला मिळते. मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात यात सर्व कुटुंबीय व तरुण पिढी सहभागी होताना दिसते. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी व रात्री चालणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.
तळेरेत ७५ कुटुुंबांचा एकच गणपती
By admin | Published: September 14, 2016 9:47 PM