दोडामार्ग : येणारी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या संजू परब यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केल्यावर आपल्यासोबत किती नगरसेवक आणले. परमे आणि कोलझर सोसायटी निवडणुकीत सत्ता आणलेल्या संचालकात स्वतःच्या पक्षाचे किती संचालक आहेत? याचे प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मगच स्वबळाच्या बाता माराव्यात, असे प्रत्युत्तर शिंदेंसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी बुधवारी दिले. शिवाय सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या कुबड्या घेण्याची वेळ परब यांच्यावर आली, त्यातच त्यांचा पराभव आहे, अशी जहरी टीकाही केली.परब यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे वक्तव्य केले होते. त्याला भाजपकडून पत्रकार परिषदेतून उत्तर देण्यात आले. यावेळी कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, संजय सातार्डेकर, दीपक गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, भैया पांगम आदी उपस्थित होते.दळवी पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांचे काम भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. त्यामुळेच ते निवडून आले. याची जाणीव शिंदेसेनेच्या प्रत्येकाने ठेवावी. ज्यावेळी विधानसभा निवडणूक लागली होती त्यावेळी याच शिंदेसेनेच्या पक्षातील बरेचसे पदाधिकारी व कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम करत होते. मात्र, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचा आदेश पाळून केसरकरांचे काम केले.निवडणुका संपलेल्या नाहीत : चेतन चव्हाणदोन सोसायट्यांच्या निवडणुका जिंकून संजू परब यांना स्वबळावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पडत असेल तर भविष्यात निवडणुका संपलेल्या नाहीत. त्यांना आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद दिसेल, असा गर्भित इशारा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिला.शिंदेसेनेने उद्धवसेनेच्या घेतल्या कुबड्या : दळवीआताच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत शिंदेंसेनेला महायुतीचा विरोधक असलेल्या उध्दवसेनेच्या कुबड्या घ्याव्या लागल्या, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. यातच त्यांचा खरा पराभव आहे, अशी टीका सुधीर दळवी यांनी केली.
दोडामार्गमध्ये भाजप-शिंदेसेनेत स्वबळावरून जुंपली; मगच बाता माराव्यात, संजू परब यांना सुधीर दळवींचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:38 IST