प्रथमेश गुरव-- वेंगुर्र्ले --‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी परदेशी आहे. आॅस्ट्रेलिया व अमेरिका यासारख्या प्रगत देशात बऱ्यापैकी रुजलेली आहे. तेथील शेतकऱ्यांबरोबरच त्या देशाच्या उत्पन्नालाही हातभार लावणारी आहे. त्यामुळेच तेथील शासनही या उपक्रमाला प्रोत्साहन देते. आपल्या देशात ही संकल्पना नवीन असूनही जेथे कृषी पर्यटन प्रकल्प आहेत, त्यांना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज शहरी मंडळींसाठी ग्रामीण जीवन हा कुतूहलाचा विषय झाला आहे. प्रगत देशातील कृषी पर्यटन हे फक्त ‘कृषी’ पुरतेच मर्यादित असूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फळांनी बहरलेल्या झाडावरुन स्वत: हातांनी फळे तोडणे, त्याचा आस्वाद घेणे, भाजीपाला स्वत: काढणे, प्राणी पाहणे, बैलगाडीतून शेतात फेरफटका मारणे इत्यादी उपक्रम मोठ्या कल्पकतेने राबविले जातात. आपल्या देशात मात्र अजूनही शेती हा ग्रामीण जीवनाचा कणा आहे. येथील सर्व व्यवहार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी निगडीत असतात. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीलाही शेतीचेच अधिष्ठान लाभले आहे. त्यामुळे आपल्या देशात कृषी पर्यटन हे शेतीबरोबरच ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविते.भारताची ओळख खेड्यांचा देश अशी आहे. येथील जनता शेती व शेतीसंलग्न व्यवसायावर अवलंबून असल्याने शेती ही ग्रामीण भारताची संस्कृती आहे. परंतु, आज शेती व्यवसायापुढे अनेक अडचणी व आव्हाने उभी आहेत. शहरीकरणावर दिलेला भर, जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, हवामानातील अनिश्चितता या सर्वांचा परिणाम शेतीवर झालेला आहे.वाढीव उत्पादन खर्च व शेतमालाची कमी किंमत यामुळे शेतीचे आर्थिक गणित जमेनासे झाले आहे. पण या समस्यांबरोबरच या क्षेत्रात काही नवीन संधीही उपलब्ध होत आहेत. ‘कृषी पर्यटन’ ही त्यापैकीच एक संधी आहे. कृषी पर्यटन व्यवयाय एकंदरीतच जगभर वाढत आहे. विरंगुळा आणि नवनवीन अनुभूती घेण्यासाठी देशाटन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा फायदा आपल्या देशालाही मिळत आहे. पर्यटन हा शेती खालोखाल मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. त्यामुळे वाढत्या पर्यटन व्यवसायाबरोबरच रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध होत आहेत. काही शेतकरी हा उपक्रम राबवित आहेत. निसर्ग सौंदर्यात भर टाकणाऱ्या शेती व बागा, आपली स्वतंत्र ओळख आधीच निर्माण केलेले ग्रामीण खाद्यपदार्थ याचा त्यांनी भांडवल म्हणून वापर केला आहे. कृषी पर्यटनाद्वारे तेथील लोकजीवन व आदरातिथ्य याचा परिचयही पर्यटकांस करुन देत आहेत. या व्यवसायातून शेतकऱ्यांबरोबरच अनेकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उत्पन्न मिळत आहे. कोकणाचा विचार करता येथे येणाऱ्या पर्यटकांचे कोकणचे समुद्रकिनारे हे मुख्य आकर्षण आहे. येथील नारळी, पोफळीच्या, आंबा, काजूच्या बागांनी, वनश्रीने नटलेल्या कोकणच्या निसर्गसौंदर्याने मोलाची भर टाकली आहे. कृषी पर्यटन ही एक अशी संकल्पना आहे की, ज्यामध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्योग उत्पादने आणि कारभाराचा पर्यटन अनुभूतीशी संगम साधण्यात आला. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्पाची उभारणी करणे, उद्योग, शेती, फुलबागा उत्पादन प्रक्रिया इत्यादी ठिकाणी भेट सहली, शेतीवर आधारीत निवास आदी सुविधांपासून ते बैलगाडी प्रवासापर्यंत कृषी व ग्रामीण संस्कृतीशी संबंधित विविध अनुभव घेण्याची संधी या कृषी व ग्र्रामीण पर्यटनरुपाने पर्यटकांना उपलब्ध करुन देता येते.कृषी पर्यटनालाही फायदा होणार आहे. परदेशी पर्यटकांमुळे शासनाला परकीय चलन मिळू शकते. पर्यटन व्यवसायातून कराच्या माध्यमातून शासनाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. पर्यटनाच्यादृष्टीने होणाऱ्या या विकासाचे केंद्रीकरण टाळले पाहिजे. पर्यायाने माथेरान, महाबळेश्वर, गणपतीपुळेसारखी पर्यटन ठिकाणे सिमेंटची होणार नाहीत. गावातच रोजगार मिळाल्याने मुंबईसारख्या शहरातील वाढत्या शहरीकरणाचा प्रश्न सुटू शकतो. लोककला, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी वेगळा निधी लागणार नाही.
सुसंधी अन् अत्यावश्यक
By admin | Published: September 20, 2015 9:17 PM