कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होण्याचे शुक्रवारी निश्चित झाल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्र्त्यांकडून कणकवलीत ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भाजपच्या प्रसाद लाड तसेच मनोज कोटक यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह दहा जणांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होण्याचे निश्चित झाले आहे. याबाबतचे वृत्त सिंधुदुर्गात पसरताच जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच घोषणाबाजी करीत एकच जल्लोष केला. कणकवली येथील बसस्थानकासमोरील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ‘नारायण राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशिदास रावराणे, युवक काँग्रेस कणकवली विधानसभा मतदार संघ अध्यक्ष संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, संदीप भोसले, महिला आघाडी शहराध्यक्षा मेघा गांगण, नासिर शेख, सुशिल सावंत, अजय गांगण, संतोष चव्हाण, भाई काणेकर, सुशिल पारकर, नगरसेवक अण्णा कोदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
नारायण राणेंच्या निवडीने कार्यकर्त्यांचा जल्लोष
By admin | Published: June 03, 2016 11:10 PM