मालवण : मेरीटाईम बोर्डाने केलेल्या नव्या जलक्रीडाबाबतच्या धोरणामध्ये मालवणातील केवळ एकच ठिकाण निश्चित केल्याने येथील व्यावसायिक आणि मच्छिमार या धोरणाविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान याबाबत, मंगळवारी मुंबईत मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे या व्यावसायिकांनी स्पष्ट केले. याबाबतची बैठक येथील संस्कार हॉल येथे पार पडली. यावेळी बाबा मोंडकर, हरी खोबरेकर, छोटू सावजी, दिलीप घारे, रुपेश प्रभू, दामू तोडणकर, सचिन गोवेकर, आदी पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार उपस्थित होते. शासनाने नवीन जलक्रीडा धोरण स्थानिकाना विश्वासात न घेता ठरविले आहे, असा आरोप या व्यावसायिकांनी केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनाही या नव्या धोरणाविषयी माहिती नाही. शासनाच्या या धोरणाला आमचा विरोध आहे. हे धोरण रद्द करून आपण मागणी करू तेच धोरण शासनाने ठरविले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका या वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि मच्छिमारांनी घेतली आहे. मेरीटाईम बोर्डाने जलक्रीडा धोरण (वॉटर स्पोर्ट्स पॉलिसी) २०१५ अंमलात आणले आहे. सिंधुदुर्गात जलक्रीडा प्रकार वाढत असून देश-विदेशातील पर्यटकांचे ते आकर्षण ठरत आहेत. शासनाच्या नव्या धोरणाला येथील व्यावसायिकांसह मच्छिमारांनी विरोध केला आहे. जलक्रीडा धोरण ठरविताना स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेतलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले गेले नाही. या व्यवसायात आज अनेक बेरोजगार उतरले आहेत. येथील तरुणांना उदरनिवार्हाचे साधन बनले आहे. असे असताना शासनाने या धोरणात जाचक अटींचा समावेश केल्यामुळे या धोरणाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशी सूचना मांडण्यात आली. याबाबत मंगळवारी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे धोरण रद्द करण्यासाठी येथील आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले. या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक होणार असून, हा प्रश्न निकाली काढला जाईल. पक्ष व्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नव्या जलक्रीडा धोरणाला विरोध
By admin | Published: August 10, 2015 8:37 PM