कुडाळ : कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठेही उड्डाणपूल नको, असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी कुडाळ बचाव समितीच्या सभेत उड्डाणपुलाला विरोध केला. मात्र, शहरात लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास या मागण्यांबाबत सर्वांचे एकमत झाले.चौपदरीकरणामुळे कुडाळ शहराचे दोन भाग होत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ बचाव समितीच्यावतीने उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली होती. मात्र, या उड्डाणपुलाच्या मागणीवर दोन मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे रविवारी श्री देव मारुती मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, बचाव समितीचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले, गजानन कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, राजन बोभाटे, संतोष शिरसाट, भाऊ शिरसाट, डॉ. जोशी, डॉ. जी. टी. राणे, संजय पिंगुळकर, निलेश तेंडोलकर, प्रणय तेली, मयूर बांदेकर, एकनाथ पिंगुळकर, सदानंद अणावकर उपस्थित होते.सभेत उड्डाणपुलाचे महत्त्व सांगताना उड्डाणपूल झाले तर शाळकरी विद्यार्थी तसेच शेतकरी, त्यांची गुरेढोरे, दुचाक्या, छोटी वाहने यांना सुरक्षितता मिळणार आहे, असे सांगण्यात आले. मात्र, याला शहरातील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. जर उड्डाणपूल झाले तर वाहने कुडाळ शहरात थांबणार नाहीत. त्यामुळे व्यापारावर विपरीत परिणाम होणार आहे.
अपघात किती होतील, त्यात किती दगावतील यापेक्षा व्यापार कायम झाला पाहिजे, असे सांगून व्यापाऱ्यांनी उड्डाणपुलाला कडाडून विरोध केला. तर लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास मागण्यांवर एकमत झाले. याठिकाणी लेव्हल सर्कल झाल्यास वाहनचालक कुडाळ शहरात येऊ शकतात.