सावंतवाडी : कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.
हा प्रकल्प प्रशासनाने आठवड्यात रद्द करावा. अन्यथा आम्ही ७ जूनला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा कोनशी भालावल ग्रामस्थांनी दिला असून, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांना दिला आहे.यावेळी भालावल उपसरपंच समीर परब, दिलीप गवस, गंगाराम नाईक, विठ्ठल गवस, सिद्धेश गवस, न्हानू सावंत, दीपक गवस, प्रविण सावंत, भरत सावंत, राजन गवस, लक्ष्मण गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कोनशी येथे नव्याने पाणी बॉटल प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले होते. पण या प्रकल्पाला कोनशी व भालावल ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.हा प्रकल्प झाला तर पाणीटंचाई भासेल. प्रकल्प उभारण्यासाठी खासगी जागेत १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतकडून आठ वर्षापूर्वी परवानगी घेण्यात आली होती. त्या आधारे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पण याला गावातील लोकांची परवानगी घेण्यात आली नाही. ८० टक्के ग्रामस्थ विरोधात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.स्वाभिमान पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी : परबमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोनशी भालावल ग्रामस्थांच्या पाठीशी राहाणार आहे. कारण हा प्रकल्प अन्यायकारक असाच आहे. जर दिवसाला पाच लाख लीटर पाणी वापरण्यास सुरूवात केली तर पाणी कसे पुरेल असा सवाल ही यावेळी संजू परब यांनी केला असून, ग्रामस्थ जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही पाठीबा देऊ, निर्सगाशी कोणीही खेळ करण्याचा प्रयत्न करू नये असेही परब यांनी सांगितले.आठ दिवसांत प्रकल्प रद्द कराजर हा प्रकल्प झाला तर आम्हाला पाणी मिळणार नाही. तसेच बागायतींमधील झाडे मरून जातील याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकल्पातून दिवसाला पाच लाख लीटर पाण्याचा वापर केला जाईल असे झाले तर पिण्यासाठी ही पाणी मिळणार नाही. त्यामुळे प्रकल्पाला आमचा कायम विरोध राहाणार आहे. तसेच प्रसंगी या प्रकल्पाविरोधात उपोषणास बसणार असून प्रशासनाने येत्या आठ दिवसांत प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ही यावेळी ग्रामस्थांनी केली आहे