प्रथमेश गुरव- वेंगुर्ले -सुमारे ४० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने नसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बैलगाडीला अनन्यसाधारण महत्त्व होते. श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या लग्नसोहळ्यासाठी खास फुलांनी व रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या व आॅईल पेंट कलरनी रंगविलेल्या बैलगाड्या आज जरी नामशेष होत आल्या असे वाटत असले, तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीसाठी आजही त्या जपल्या आहेत. पर्यटनदृष्ट्या अशा बैलगाड्या बैलांंसह सजवून पर्यटकांसाठी सफर आयोजित केल्यास त्यास पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू शकतो.पूर्वीच्याकाळी लग्नसमारंभ, शेतातील माल ने-आण करण्यापासून ते आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यापर्यंत बैलगाडीचा वापर होत असे. बैलगाडी असणाऱ्या व्यक्तीलाही समाजात मानाचे स्थान होते. एका गावातून दुसऱ्या लांबच्या गावात जाण्यासाठी अशा बैलगाड्या एकत्र येऊन प्रवास करीत. रात्रीच्या मुक्कामी एकत्र जेवण, थंडीचे दिवस असतील, तर शेकोटी पेटवून गाणी वगैरे म्हणण्याचा कार्यक्रम होत असे. पहाटेच्यावेळी काहीसे झुंजूमुंजू होत आलेलं असायचं. बैलगाडीचा मालक आपल्याच तोऱ्यात गाणी म्हणत त्यांचा पुढील प्रवास होत असे.मात्र, नंतर हे चित्र बदलत गेलं. विज्ञान युगातील क्रांतीमुळे दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आल्या. या गाड्यांमुळे माणूस जलदगतीने नियोजितस्थळी पोहोचू लागला. अशा गाड्यांच्या किमतीही परवडणाऱ्या असल्याने लोकांनी या गाड्या घेणे पसंत केले आणि प्रवासासाठी बैलगाडीचे महत्त्व कमी होऊ लागले. असाच बदल शेती क्षेत्रातही झाला. शेती करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचा वापर व्हायचा. मात्र, ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेत नांगरणी सोईची होऊ लागली. वर्षभर बैलांची निगा राखण्यात वेळ घालविण्यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे केलेली शेती शेतकऱ्यांना सुलभ वाटू लागली. शेतातील माल ने-आण करण्यासाठीही चारचाकी गाड्यांचा वापर होऊ लागला. त्यामुळे शेतीतून काही प्रमाणात बैलांचे दिसणे बंद झाले; परंतु काही ठिकाणी आजही शेतकरी शेतीमध्ये बैल व बैलगाड्यांचा वापर करताना दिसतात. सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित झाला. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पर्यटनाचे लोण पसरले. पर्यटकांना इथले निसर्गरम्य समुद्रकिनारे, जुन्या चालीरीती, खाद्यसंस्कृती यांचे आकर्षण वाटू लागले. हे सारं प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात भेटी देत आहेत. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून पर्यटकांना ग्रामीण भागात आकर्षित करणे आता गावातील लोकांना सहजरीत्या जमू लागले आहे. पर्यटकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. हे वायंगणी येथील होणाऱ्या कासव जत्रेला दरवर्षी वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे दिसून येते. वेंगुर्ले शहरातही जागृती बचत गटाच्या सायली मालवणकर यांनी पर्यटकांना केळीच्या पानात भोजनाचा आस्वाद देणे, त्यांना पारंपरिक खाद्यपदार्थ बनवायला शिकविले आहे. तसेच येथील सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यांना ओळख करून त्यांनाही यात सहभागी केले जाते. यामुळे पर्यटक याठिकाणी आकर्षिला जात आहे.बैलगाडी नामशेष होण्यापासून वाचविणे हे सद्य:स्थितीत बैलगाडी वापरत असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्यांच्यापुढे सफारीचा पर्याय आहे.जुनं तेच सोनं..!मग याच पर्यटकांना नामशेष होत चाललेल्या बैलगाडीतून सफर घडविल्यास ते येथील प्रवासाचा आनंद घेतील. बैलगाडीतून अनोखी प्रवास सफर त्यांना निश्चित आवडेल व ते उत्साहाने यात सहभागी होतील. त्यामुळे बैलगाडी मालकांनाही याचा अल्प का होईना, पण मोबदला जरूर मिळेल आणि बैलगाड्याही नामशेष होण्यापासून वाचतील. पर्यटनाच्या माध्यमातून बैलगाड्यांना नवी दिशा मिळेल. जे दुर्मीळ आहे, ते जुनं असलं तरी सोनं ठरणारं आहे. बैलगाडीही याला अपवाद नाही.
बैलगाड्यांसमोर सफारीचा पर्याय
By admin | Published: November 09, 2015 11:56 PM