सिंधुदुर्ग : मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.
याबाबत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेताना शिवजयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या संबंधित शिक्षकांचा त्या दिवशीचा पगार काढू नका, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या.दरम्यान, शिरवंडे प्रशालेत शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्याध्यापिके व्यतिरिक्त अन्य शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवजयंती कार्यक्रमही १५ मिनिटात गुंडाळण्यात आला. शिवजयंतीला दांडी मारणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी घाडीगांवकर यांनी सांगितले. याबाबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती अशोक बागवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगांवकर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या श्याम चव्हाण यांचे सभापती कोदे व बागवे यांनी स्वागत केले. तर मालवण तालुक्यात नरेगा अंतर्गत ३ कोटी ५७ लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला असून जिल्ह्यात मालवण तालुका अग्रक्रमावर आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी पराडकर यांनी दिली.ठेकेदाराकडून काजू पिकाचे नुकसानसध्या काजू पिकाचा हंगाम सुरू असताना वीज वितरणच्या ठेकेदाराकडून श्रावण परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता काजूच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जात आहे. काजू पिकाचा हंगाम संपल्यानंतर फांद्या तोडण्यास काही हरकत नसताना ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचे राजू परुळेकर यांनी सांगितले. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, अशी सूचना मांडली.