मालवण : मतदारयादीत ज्या मतदारांची नावे दुबार नोंद झाली आहेत. तसेच दुबार ओळखपत्र क्रमांक मिळाला आहे किंवा यादीतील नावात चुका झाल्या आहेत, अशा मतदारांच्या याद्यांचे शुद्धिकरण करणे व प्रमाणीकरण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून तहसील कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मालवण तालुक्यात या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. ३१ जुलैपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तालुक्यातील मतदारांनी याचा फायदा घ्यावा व मतदार यादीतील सदोषता घालविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार वनिता पाटील यांनी गुरुवारी केले आहे.या कार्यक्रमांतर्गत मतदारांचे मतदार ओळखपत्राचा डाटा यूआयबीच्या आधारकार्ड डाटाशी जोडण्यात येणार आहे. दुबार नोंद झालेली नावे कमी करण्यात येणार आहेत. यादीतील नोंदीबाबत कोणत्याही चुका असल्यास पुराव्याच्या आधारावर त्या दुरूस्त केल्या जाणार आहेत. मतदार यादीत खराब फोटो असल्यास त्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. याकरिता नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांचे आधारकार्ड झेरॉक्स, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता घेणार असून, मतदार यादीच्या डाटाबेसमध्ये त्याची नोंद करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दुबार मतदार नोंदी स्वेच्छेने कमी करण्याबाबत सूचना दिल्या. मतदार यादीत दुबार नोंद ही बाब दंडनीय असल्याने मतदारांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमादरम्यान १२ एप्रिल, १७ मे, २१ जून, १२ जुलै यादिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करणार आहेत. याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)घरोघरी जाऊन मतदारांचे आधारकार्ड झेरॉक्स, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता घेणार असून, मतदार यादीच्या डाटाबेसमध्ये त्याची नोंद करण्यात येणार आहे.
मतदारयादी प्रमाणीकरणाचा आदेश
By admin | Published: April 10, 2015 9:39 PM