सावंतवाडी: आंबोली येथे सामान्य माणसाला वन विभागाकडून त्रास दिला जातो, पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंट काँक्रीटचे जंगल कशी काय उभी राहतात हे कळत नाही. वन विभागाने सिमेंट काँक्रीटची जंगले तत्काळ थांबवावीत अन्यथा त्यांच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. याची जबाबदारी सर्वस्वी वनविभागाची असेल असेही ते म्हणाले. तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी अद्याप पर्यंत संभाव्य यादी तयार झाली नसल्याचे हे त्यांनी सांगितले.पंचायत समितीमध्ये आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक तथा पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर उपस्थित होते.तेली पुढे म्हणाले, पाच राज्याचा निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हा चमत्कार दिसून येणार आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता स्थानिक आमदार दीपक केसरकर अजूनही कोट्यवधीच्या वल्गना करत आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झाली नसून ते केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहे. चांदा ते बांदा योजनेचे पैसे परत गेल्याचे सांगून एक प्रकारे आपण कितपत अकार्यक्षम पालकमंत्री होतो हे स्वतःच्या तोंडातून ते सांगत आहेत. येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची कुठलीही संभाव्य यादी तयार करण्यात आलेले नाही. सर्वांना सोबत घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.केसरकर श्रेय लाटत आहेतआंबोली चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न हा फडणवीस सरकार काळातच मिटला आहे. केवळ औपचारिकताच बाकी आहे. मात्र केवळ श्रेय मिळावे म्हणून आमदार दिपक केसरकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीचे कारण पुढे करत आहेत अशी टीकाही राजन तेली यांनी केली.
सामान्यांना त्रास पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंटची जंगले, राजन तेली आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 5:41 PM