सावंतवाडी : सावंतवाडीसारख्या ठिकाणी दरवर्षी ‘नवरंग’च्या माध्यमातून ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम आयोजित होतो. हे खरोखरच सावंतवाडीकरांचे भाग्य असून, सिंधुदुर्गमध्ये लवकरच शिल्प संमेलन आयोजन करण्याचा आमचा विचार आहे. त्याला येथील रसिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.येथील मोती तलावाच्या काठावर नवरंगच्यावतीने पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, अध्यक्ष श्रीपाद चोडणकर, बाळ पुराणिक, नीलेश मेस्त्री, गुरू चिटणीस आदी उपस्थित होते.यावेळी नवरंगचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. त्यानंतर बोलताना केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग ही कलाकरांची भूमी असून, अनेक कलाकार या मातीत वाढले. त्यांनी सिंधुदुर्गचे नाव सर्वत्र रोशन केले. याचा येथील स्थानिक नागरिकांना अभिमान आहे. सिंधुदुर्गमध्ये या कलाकारांंच्या प्रेरणेतूनच एक भव्य-दिव्य शिल्प संमेलन भरवण्याचा माझा विचार असून, शासन त्याला सर्व सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पाडवा पहाटच्या निमित्ताने ही घोषणा प्रथमच मी करीत असून, याला विशेष असे महत्त्व आहे. सिंधुदुर्गमधील अनेकांशी माझी चर्चा झाली असून, त्या कलाकारांनीही मला यामध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले. पाडवा पहाटसारखा कार्यक्रम नवरंगचे सर्व संगीत प्रेमी भरवतात आणि येथील कलेला जिवंत ठेवतात. त्यांचे हे काम वाखण्याजोगे असल्याचेही यावेळी मंत्री केसरकर म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मोती तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात संगीत रसिकप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ पुराणिक यांनी केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात शिल्प संमेलन भरवणार
By admin | Published: November 13, 2015 10:56 PM