चिपळूण : पिंपरी - चिंचवड ही संताची भूमी आहे. या भूमीत हे साहित्य संमेलन होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या औद्योगिक भूमिला साजेसे साहित्य संमेलन आम्ही घेणार आहोत. या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी जेथे जेथे गेलो तेथे साहित्यप्रेमींचे मला अपार प्रेम लाभले. साहित्य विश्वाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. माझी पूर्वपुण्याई म्हणूनच मला स्वागताध्यक्ष होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी आज (बुधवारी) केले. पिंपरी - चिंचवड येथे दि. १५ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील लेखक, साहित्यिक व नागरिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने व निमंत्रण देण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पाटील चिपळूणमध्ये आले होते. शहरातील राधाताई लाड सभागृहात जिल्ह्यातील लेखक, साहित्यिक व नागरिकांशी संवाद साधून संमेलनाला येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी ज्येष्ठ कवी अरुण शेवते, माजी आमदार व संपादक नानासाहेब जोशी, को - आॅर्डिनेटर सचिन एटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रा. सुहास बारटक्के उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने नानासाहेब जोशी यांनी पाटील यांचा सत्कार केला. पहिले निमंत्रण नगराध्यक्षा सावित्री होमकळस व त्यांच्या सहकाऱ्यांना डॉ. पाटील यांनी दिले. माजी आमदार जोशी यांनी चिपळूणमध्ये झालेले नाट्यसंमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, संगीत महोत्सव व साहित्य संमेलन यशस्वी झाल्याच्या आठवणी यावेळी जागवल्या. राज्यात जळगावनंतर या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. हे शहर चांगल्यारितीने सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य लोकांच्या घरापर्यंत पोहचवावे. पुण्याची समृध्दी कोकणने केली हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवराय व लोकमान्य टिळक यांची उदाहरणे दिली. कोकणाकडे आपण प्रेमाने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार भावे यांनी संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनात लेखक, साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी राज्यातील विविध विभागात भेटी देत जागृती करत असल्याचे सांगितले. तरुणांसह सर्वांना संमेलनाचे अपडेट मिळावेत यासाठी स्वतंत्र अॅप तयार केले आहे. संमेलनाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७० लाखाचा निधी दिला जाणार आहे, असे पी. डी. पाटील यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)अॅपचे आज उदघाटनप्रगत, अप्रगत समाजाला एकत्र घेऊन जाणारे बोधचिन्ह संमेलनात आहे. त्याचे अॅनिमेशन केले आहे. संमेलनाचे अपडेट कळवण्यासाठी तयार केलेल्या अॅपचे उद्घाटन गुरुवार दि. १७ रोजी अभिनेते अमोल कोल्हे यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गीतकार गुलजार, माजी संरक्षण मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप नितीन गडकरी, विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत होईल. या संमेलनात गुलजार, गायिका आशा भोसले, चेतन भगत यांच्या मुलाखती होतील.
औद्योगिक भूमीला साजेसे साहित्य संमेलन करणार
By admin | Published: December 17, 2015 12:16 AM