ओरोस : राष्ट्रीय ग्राहक दिन हा २४ डिसेंबरला साजरा केला जातो. यानिमित्त जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे येत्या बुधवारी (दि. २४) सकाळी १० वाजता कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ‘ग्राहक चळवळीसमोरील आव्हाने’, ‘ग्राहक राजा जागा हो’, ‘ग्राहकांचे हित हेच देशाचे हित’ असे विषय असून स्पर्धेची वेळ १० मिनिटांची आहे. जिल्हास्तरावरील ग्राहक चळवळीशी संबंधित असलेल्या स्वयंसेवी संस्था त्याचप्रमाणे स्थापन झालेल्या विद्यार्थ्यांचे कंझ्युमर क्लब यांच्या सहभागाने राष्ट्रीय ग्राहक दिनी तसेच पूर्ण सप्ताहभर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने, शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा, ग्राहक संरक्षणविषयक निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध प्रकारचे ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.महाविद्यालयातील इच्छुक दोन विद्यार्थ्यांची नावे कुडाळ तहसीलदार व संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे देण्यात यावीत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रोख १५०० रुपये व प्रशस्तिपत्रक, द्वितीय १००० रुपये व प्रशस्तिपत्रक, तृतीय ५०० रुपये व प्रशस्तिपत्रक, तर उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी केले आहे. (वार्ताहर)
राष्ट्रीय ग्राहकदिनानिमित्त बुधवारी वक्तृत्व स्पर्धा
By admin | Published: December 19, 2014 9:27 PM