सावंतवाडी : ओरोस येथील कारागृहाचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्यापपर्यंत किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील. त्यामुळे हे कारागृह एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक बिपीनकुमार सिंह यांनी दिली. ओरोस येथील कारागृहात राज्यातील शिक्षा भोगलेले कैदी ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सावंतवाडीतील कारागृह बंद करण्यात येणार नसल्याचा खुलासही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.कारागृह महानिरीक्षक सिंह यांनी गुरुवारी ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहाची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी कारागृहाचे अधीक्षक एस. बी. सदाफुले उपस्थित होते. यावेळी सिंह म्हणाले, ओरोस येथील कारागृहाची क्षमता १५० कैद्यांची असून, याठिकाणी शिक्षेस पात्र व शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे कैदी राज्यातील असतील, असेही त्यांनी सांगितले. यापुढे कैद्यांना न्यायालयात न्यावे लागणार नाही अशी व्यवस्था शासन करीत असून, न्यायालये थेट व्हिडिओ कॉन्फरसिंगने जोडली जाणार असल्याने पोलिसांवरचा भार हलका होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.ओरोस येथे कैद्यांसाठी छोटा उद्योग उभारणारओरोस येथे कारागृहाव्यतिरिक्त शासनाची दोन ते तीन एकर जमीन असून, तेथे कैद्यांसाठी एखाद्या छोट्या उद्योगाची उभारणी करण्याबाबत आमचा विचार सुरू असल्याचे यावेळी सिंह यांनी सांगितले. हे कारागृह छोटे असल्याने मोठा उद्योग आणून चालणार नाही. छोटे उद्योगच येथे उभारावे लागतील, असेही ते म्हणाले.प्रत्येक सुनावणी कारागृहातूनच होणारराज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची संख्या आहे. मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतच याची सख्या १० हजार एवढी आहे. त्यामुळे आरोपीची सुनावणी ही कारागृहातच होणार आहे. तसे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात ब्रॉडबॅण्ड यंत्रणेमुळे ही सुविधा अद्याप सुरू झाली नसल्याचे सिंह यांनी सांगितले.
ओरोस येथील कारागृह एप्रिलपासून सुरू होणार
By admin | Published: February 11, 2016 9:37 PM