सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयातील अलीकडेच रुजू झालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा मानसिक छळ करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून एका महिन्यात अन्यत्र बदली करावी; अन्यथा जिल्हा रुग्णालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा ओरोस सरपंच मंगला ओरोसकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ओरोस सरपंच मंगला ओरोसकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयात अलीकडेच रुजू झालेल्या आणि चांगली रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला काही स्थानिक कर्मचाऱ्यांकडूनच त्रास दिला जात असल्याचा प्रकार संबंधित डॉक्टर दाम्पत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जावरून उघड झाला आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला बाधा आणणारी आहे. यापूर्वी स्थानिक लोकच डॉक्टरांना त्रास देतात. मारहाण करतात, धमक्या देतात, असे आरोप जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार होत होते. परंतु यामागे जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारीच भडकविण्याचे काम करीत होते. जेणेकरून आपल्या नोकरीवर गदा येणार नाही आणि डॉक्टर जिल्ह्यात न येण्याचे कारण स्थानिक लोकांच्या माथी मारले जावे हे षड्यंत्र आखले जात होते. मात्र, सध्या सुरु असलेल्या प्रकारामुळे याच्या मुळाशी कारण काय आहे हे जनतेसमोर आले आहे. तसेच काही कर्मचारी वर्षानुवर्षे मक्तेदारी दाखवत येथे कार्यरत आहेत अशांना जिल्हा शल्यचिकित्सक पाठीशी घालत असल्याचा आरोपही या निवेदनातून त्यांनी केला आहे. तरी या प्रकरणी सखोल चौकशी करून चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्यांची तत्काळ बदली करावी. गोरगरीब जनतेला चांगली रुग्णसेवा मिळण्याच्या दृष्टीने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) ‘त्या’ प्रवृत्तींचा जाहीर निषेध चांगल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांची एक महिन्यात अन्यत्र बदली करावी; अन्यथा जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा ओरोस सरपंच मंगला ओरोसकर यांनी दिला आहे. तर डॉक्टरांचा मानसिक छळ करणाऱ्या प्रवृत्तींचा जाहीर निषेध केला आहे.
...अन्यथा जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण
By admin | Published: November 25, 2015 11:29 PM