दापोली : शिधापत्रिका संगणकीकृत करण्याकरिता रेशनकार्डवरील सर्व सदस्यांचा आधारकार्ड व शिधापत्रिका प्रमुखाचे बँक खाते क्रमांक जोडण्याचे पुन्हा आवाहन करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयातून मागितलेल्या माहितीची पूर्तता न केल्यास धान्य पुरवठा बंद करण्याचा इशारा देखील शासनाकडून देण्यात आला आहे. याआधी देखील अशाप्रकारे रेशन कार्डसाठी आधारकार्ड, बँक खाते क्रमांक देण्यात आले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तसेच या गोष्टींची नोंद न केल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकाचा धान्यपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची तसेच आधारकार्ड, बँक खाते क्रमांक जमा करण्याची सूचना रास्त धान्य दुकानांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. या नोटिसची मुदत फक्त आठ दिवसांची असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच याआधी अर्जावर लिहिण्यात आलेले आधारकार्ड क्रमांक हे निळ्या शाईने लिहिण्यात आले होते. परंतु, आता हे क्रमांक लाल शाईने लिहिण्यात येणार असल्याचे देखील या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे सर्व पुन्हापुन्हा कशासाठी? आम्ही एकदा जमा केलेली आधारकार्ड, बँक पासबुकची झेराक्स गहाळ केली का? तसेच हे सारं पुन्हा करून धान्यात वाढ होणार आहे का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. तसेच दापोली तालुक्यातील मुरूड येथील रेशनदुकान उशिराने उघडत असल्याने येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाने आता निर्वाणीचा इशारा दिल्याने ग्रामीण भागातील जनतेची आधारकार्ड आणि शिधापत्रिका बँक खात्याशी जोडून घेण्यासाठी धावपळ उडाली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
...अन्यथा रेशनवरून धान्य पुरवठा बंद
By admin | Published: March 04, 2016 10:34 PM