कणकवली : कणकवली तालुक्यातील लोरे नं.1 येथील शेतकऱ्यांवर एस्मो ट्रेडिंग कंपनी अन्याय करीत आहे. त्याबाबतच्या तक्रारी कणकवली तालुका मराठा समाजाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या बाजूने आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
लोरे येथील शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. अन्यथा एस्मो ट्रेडिंग कंपनी विरोधात मराठा समाजाच्यावतीने केव्हाही आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष एस.टी.सावंत व लवू वारंग यांनी दिला आहे.याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली तालुक्यात लोरे नं 1 येथे एस्मो ट्रेडिंग कंपनी गेली पंचवीस वर्षे खाण व्यवसाय करीत आहे. लोरे येथे मिळणारी सिलिका अत्यंत उच्चप्रतिची असून तिला चांगला दर मिळतो. सुरुवातीला या गावात अनेक छोटे मोठे स्थानिक खाण व्यावसायिक व्यवसाय करीत होते. परंतु एस्मो या कंपनीचे मालक के.के.सुवर्णा यांनी काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून तसेच स्थानिक कार्यक्रमाना किरकोळ देणग्या देवून स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.तसेच लोरे गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी लीजवर घेतल्या आहेत. पण त्या शेतकऱ्यांना अद्याप भाड़े दिलेली नाही. वारंवार गावातील काही लोकांना हाताशी धरून राजकारण करुन शासकीय यंत्रणामधील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचा दबाव गावात निर्माण केला आहे.त्याना कोणी विरोध केला तर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्यापर्यन्त त्यांची मजल गेली आहे. याबाबतच्या तक्रारी शांताराम रावराणे, राजू रावराणे, चंद्रकांत राणे आदीनी कणकवली तालुका मराठा समाजाकडे केल्या आहेत.आपल्यामुळेच गावात रोजगार निर्माण झाला आहे. असे के. सुवर्णा सांगत आहेत. पण प्रत्यक्षात परप्रांतीय मजुरच कामासाठी वापरले जात आहेत. तसेच मजूर पूरविणारे मुकादमही परप्रांतीयच आहेत. त्यामुळे स्थानिकाना या खाण व्यवसायातून काहीच फायदा होत नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मराठा समाजाने लोरे गावातील शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.असेही या प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.