कुडाळ : ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरू, असा इशारा कुडाळातील लोकप्रतिनिधींनी इंदापूर ते झाराप राष्ट्रीय महामार्गाच्या कुडाळ तालुक्यातील रुंदीकरणाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत प्रांताधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कशेडी घाट ते झारापपर्यंत शासन करणार असून त्याकरिता कुडाळ तालुक्यातील महामार्गाच्या लगत असलेल्या वीस गावामधील जमिनी अधिग्रहण ५ ते २९ मे या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी कुडाळ पंचायत समिती येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता, भूमी अभिलेखचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी, सभापती प्रतिभा घावनळकर, तसेच संबंधित वीस गावातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते. या सभेत जमीन मोजणी करण्याबाबत उपस्थित प्रतिनिधी आक्रमक झाले. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना पूर्वसूचना न देता मोजणी करण्यास प्रारंभ केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)योग्य पद्धतीने मोजणी करणार--कुडाळ तालुक्यातील महामार्गाच्या लगत असलेल्या वीस गावामधील जमिनींचे अधिग्रहण ५ ते २९ मे या कालावधीत करण्यात येणार आहे. या गावांमध्ये रस्त्याच्या कडेच्या जमिनीची मोजणी होणार असल्याबाबत येथील ग्रामस्थांना मात्र, कोणतीच पूर्वसूचना दिली गेली नाही, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. दरम्यान, संबंधित जमीनमालकांना नोटिसा देण्यात आलेल्या असून योग्य पद्धतीने जमीन मोजणी करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी उपस्थितांना दिले.
...नाहीतर भूमिपुत्र रस्त्यावर उतरतील
By admin | Published: April 26, 2015 10:15 PM