कणकवली : सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .
ही जिल्हा परिषदेची चांगली चालणारी शाळा अस्थिर करण्याचा हेतू काय ? जवळच्या हायस्कूलचा प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ही प्राथमिक शाळा अस्थिर केली जात आहे का ? आमचा संस्थानला विरोध नाही मात्र , शाळा तिथेच राहू देत. ती स्थलांतरित करू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास आमचा विरोध कायम राहील, अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीने स्पष्ट केली.कणकवली कांबळेगल्ली येथील पाटकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ बचाव समितीचे बाळकृष्ण कांबळे , सायली राणे , दिलीप मालंडकर , गणपत मालंडकर , प्रशांत गवळी , रवि सावंत , अमित मांडवकर , सुरेश राणे , अनिल अणावकर , विवेक पाटकर , सुमित पाटकर , रंजना पाटकर आदी उपस्थित होते .यावेळी नामानंद मोडक म्हणाले, शाळा व्यवस्थापन समितीने इमारत जीर्ण झाल्याबद्दल दुरुस्ती ठराव मांडला का ? तो नसेल तर शाळा स्थलांतरित करण्याची चर्चा तरी का ? शाळा व्यवस्थापन समितीला आजपर्यत कधीही संस्थानने विश्वासात घेतले नाही.तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली ही शाळा अस्थिर करायची आणि सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा बंद पाडायच्या , असा हा प्रयत्न आहे.शहरातील अवस्था पाहता आतापर्यंत अनेक शाळा बंद पडल्या आहेत.त्यामुळे चांगले शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या बाबतीत घडणारा हा सर्व प्रकार म्हणजे शाळा बंद कराण्याचा घाट आहे.त्याला आमचा विरोध आहे.संजय मालंडकर म्हणाले, भालचंद्र महाराज भक्त निवास बांधायचे असेल तर ते शाळेच्या पुढिल जागेत बांधावे. तसेच आमदार , खासदार निधी देत असतील , तर सध्या असलेली शाळाच दुरुस्त करावी.आम्ही त्याला समर्थन देवू . शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षात एकदाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे.कोणत्याही प्रकारची चर्चा समितीबरोबर केलेली नाही.या शाळेला कोणीच वाली नाही अशी भावना भालचंद्र महाराज संस्थानची झाली असल्याचा आरोप यावेळी बचाव समितीने केला .दरम्यान, ही शाळा आहे , तिथेच राहावी अशी आमची भूमिका आहे.ही जागा शाळेसाठी मारुती हरी आचरेकर यांनी दिली . ती व्यक्ती मोलमजुरी करणारी होती.शाळेसाठीच ही जागा वापरावी म्हणून त्यांनी जागा दिली होती.मग ती जमीन इतर कामासाठी कशी देणार ? असे मतही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले .