कणकवली : मुंबईत पंधरा दिवस सेवा बजावून आलेल्या चालक-वाहकांना कणकवली स्वॅब कलेक्शन सेंटरवर स्वॅब घेण्यासाठी बोलविण्यात आले. मात्र, त्यांना ३ तास ताटकळत रहावे लागले. या स्वॅब कलेक्शनच्या ठिकाणी असलेले आरोग्य कर्मचारी १२ वाजता कामकाज थांबवून बाहेर गेले होते. अखेर एसटीच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यासाठी विनंती केली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता कामकाजाची सुरुवात केली.मात्र, प्रशासनाच्या या सगळ्या कारभाराविरोधात एसटी वाहक व चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोरोना महामारी सुरू असल्यामुळे सिंधुदुर्गातील एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्टची सेवा बजावण्यासाठी जात आहेत. कणकवली आगारातून ८० कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टची सेवा बजावण्यासाठी पाठविण्यात आले होते.
गेले १५ दिवस सेवा बजावून हे कर्मचारी रविवारी दुपारी १२ वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथील स्वॅब कलेक्शन सेंटर येथे आले होते. या ठिकाणी आल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी नसल्याने एसटी प्रशासनाने त्यांना सोमवारी येण्याबाबत सूचित केले. त्यावेळी संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा स्वॅब घ्यावेत. नाहीतर आमच्या जीवितास धोका आहे. आमच्या कुटुंबीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकेल. त्यामुळे आजच स्वॅब घ्या अशी मागणी केली.एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरणएसटी प्रशासनाच्या मदतीने आरोग्य विभागाचे कर्मचारी आल्यानंतर स्वॅब घेण्यात आले. या कालावधीत एसटी चालक व वाहक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या असंतोषानंतर एसटी प्रशासनाने सायंकाळी ४ वाजता कर्मचाऱ्यांची भोजनाची व्यवस्था केली. तोपर्यंत ते सर्व कर्मचारी ताटकळत बसले होते. शनिवारी रात्री १० वाजल्यापासून प्रवास करीत मुंबई ते कणकवलीपर्यंत ते आलेले होते.