ओरोस : जिल्हाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कोरोना कालावधीत सतर्कता राखणे अधिक शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल उभारण्याचे राज्यभरात आदर्शवत असे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची मुख्यालयातील पत्रकारांनी भेट घेतली असता ते बोलत होते. गेडाम म्हणाले, राज्यात आणि देशात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याने मात्र जागरुकता तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून समतोल राखला.
पोलीस, पत्रकार, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन त्यांच्या सांघिक कामातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा अटकाव करण्यात यश आले आहे. जनतेनेही आपल्या मनात आदरयुक्त भीती ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. काहीवेळा नाहक फिरणाऱ्या वाहनचालकांना वाहन जप्त करणे, दंडात्मक कारवाई करणे, प्रशासनाला भाग पडले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले नाही.गेल्या वर्षा-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्ही कॅमऱ्याने जोडल्यामुळे वाढत्या चोऱ्यासह कोरोना संक्रमण कालावधीत नाहक फिरणाऱ्या दुचाकी चालकांना अटकाव करणे शक्य झाले. या आदर्शवत कामाची पोचपावती राज्यभरात मिळाली आहे. पोलिसांच्या निवासी संकुलाचा प्रश्नही मार्गी लागला. सिंधुदुर्गनगरीत उभालेल्या या पोलीस निवासी संकुलामुळे राज्यभरात एक आदर्शवत काम उभे झाले आहे. हेच उदाहरण व याचा आदर्श अन्य जिल्ह्यातून घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.जनतेचे सहकार्यकोरोना काळात सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कोरोनावर मात केली. संस्थात्मक क्वारंटाईन व होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनीही चांगले सहकार्य केले. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक जनतेची कोरोना बाधित संख्या एक ते दोन टक्केच दिसून आली. हे सिंधुदुर्गवासीयांचे यश आहे. यापुढेही कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे आवाहनही गेडाम यांनी जनतेला केले.