सिंधुदुर्ग : संततधार पावसामुळे यावर्षी काही प्रमाणात भातरोपांची वाढ खुंटली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी करपा सदृश रोगाची लागण झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट झाली असून त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक झाले आहे. अनेकदा अतिवृष्टीही झाली आहे. संततधार पावसामुळे कित्येकदा सूर्यदर्शनही झाले नाही. भातपिकाच्या वाढीसाठी योग्य पावसाबरोबरच सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता असते.
मात्र, अनेक दिवस सूर्याचे दर्शनच न झाल्यामुळे यावर्षी पिकाची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. तसेच काही भागात पिकांवर करपा सदृश रोगाची लागण झाल्यामुळे भात उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.भातशेती ही शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस डोईजड ठरत आहे. वाढती महागाई, मजूर टंचाई, निसर्गाचा लहरीपणा व वन्य प्राण्यांचा उपद्रव तसेच इतर कारणांमुळे येथील शेतकरी बेजार झाले आहेत. तसेच गवे, माकडांकडून पिकाचे नुकसान केले जात आहे.