मालवण : मालवण शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जाणकारांच्या सांगण्यानुसार बाजारपेठेत ‘पूर्वीच्या काळी सोन्याचा धूर निघायचा’. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणनगरीला शिवकालीन परंपरा लाभलेली आहे. दिवाळी पाडवा म्हणजे मालवण बाजारपेठेची व्यापारी वर्षाची सुरुवातच. दिवाळी पाडव्या दिवशी ३५० वर्षांची शिवकालीन पार्श्वभूमी असलेली ग्रामदेवता श्री रामेश्वर-नारायण पालखी सोहळा. या सोहळ्याला व्यापारी वर्गात विशेष महत्व असून मालवणच्या ‘अर्थकारणाची पालखी’ म्हणून संबोधल्यास वावगे ठरणार नाही. दिवाळीची चाहूल लागली की शहरातील दुकाने सजायला लागतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे औचित्य साधून व्यापारी वर्गात मोठी धांदल उडालेली असते. व्यापारी वर्षाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी व्यापारी सज्ज झालेले असतात. मालवणात पूर्वीच्या काळी सोन्याचा धूर निघायचा असे जाणकारांकडून सांगितले जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी बाजारपेठ वैभवशाली होती. त्यानंतर काळाच्या ओघात शहराचे वैभव मागे पडत असल्याचे वाटत असताना पर्यटन विकसित होऊ लागले. आणि पर्यटनाच्या जोडीने मालवण बाजारपेठ पुन्हा एकदा देशी-विदेशी पर्यटकांच्या खरेदीने वैभवशाली बाजारपेठेकडे वाटचाल करीत आहे. गतवर्षी वरूणराजाचे दिवाळीत संकट ओढवले होते. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल कोलमडली होती.लाखोंची उलाढालविविधरंगी आकाशकंदील, स्थानिक आणि चिनी बनावटीच्या पणत्या, रांगोळीच्या विविध रंगांचा मेळ, तयार कपडे, चायनीज तोरणे, विविध साहित्याने भरलेली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फटक्यांची दुकाने, दिवाळीचे गोडधोड पदार्थ, त्यासाठी लागणारी कडधान्ये, तयार पिठ, तेल, लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळी आदी पदार्थ यांची मागणी मोठी असते. त्यामुळे एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल सहजशक्य होते. ई कॉमर्सचा काहीसा फटका येथील बाजारपेठेतला बसला आहे. (प्रतिनिधी)पालखी सोहळ्याचे बाजारपेठेत नवचैतन्यगतवर्षी पाऊस बरसल्याने खरेदी कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे साधारण वर्षभर बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण यांच्या आशीर्वादाने यावर्षी बाजारपेठ सजली. ऐतिहासिक पालखीचे महत्व सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे यादिवशी जिल्हाभरातून भाविक दाखल होतात. तसेच मुंबईस्थित मालवणकरही आवर्जून हजेरी लावतात. या सर्वांवर बाजारपेठ अवलंबून असते. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पालखी सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली. यानिमित्ताने मालवण बाजारपेठेवर आलेले मंदीचे सावट दूर झाले. दिवाळी पाडवा व्यापारी वर्गासाठी नूतन वर्ष असते. यावर्षी व्यापारी वर्षाची सलामी चांगली झाली असल्याचे भावना व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आली.
अर्थकारणाची ‘पालखी’ अन् व्यापाऱ्यांची ‘दिवाळी’
By admin | Published: November 13, 2015 10:57 PM