शिरगांव : ८४ खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी गावच्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर-पावणाई देवस्थानातील राजेशाही थाटात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवातील पालखी मिरवणुकीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. ही परंपरा साळशी गावाने आजही जपली आहे.नवरात्रोत्सवात इनामदार श्री पावणाईदेवीच्या देवालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दररोज सायंकाळी ७ वाजता नौबत वाजविली जाते. रात्री ९ वाजता प्रवचनाच्या कार्यक्रमानंतर रात्री १० वाजता आरती होते. रात्री १०.१५ वाजता पालखी मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात होते. पालखीत इनामदार श्री पावणाई देवीची चांदीची उत्सवमूर्ती विराजमान केली जाते. पालखीबरोबर दोन भोई, सुश्राव्य गायन-वादन करणारे घडशी, गोंधळी, गुणीजन (साळसकर), भालदार, चोपदार, अबदागीर, निशाणदार, चौखीदार, दोन मशालदार तसेच राजसत्ता व पूर्वसत्ता मानकरी, बारा-पाच मानकरी व भक्तगणांच्या लवाजम्यासह राजवैभवाच्या थाटात, ढोलताशांच्या गजरात पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे इनामदार श्री पावणाईदेवीची पालखी सभामंडपातून प्रदक्षिणेस निघते. प्रथम इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाभोवती प्रदक्षिणा घालून नंतर इनामदार श्री पावणाई देवीच्या व श्री देव रवळनाथाच्या देवालयाभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा इनामदार श्री पावणाईदेवीच्या सभामंडपात पालखी मिरवणूक सोहळ्याचे विसर्जन होते. प्रदक्षिणेच्यावेळी ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या त्याठिकाणी घडशी, गोंधळी, गुणीजन (साळसकर) यांच्या सुश्राव्य गायन-वादनाचा कार्यक्रम होतो. पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर इनामदार श्री पावणाई देवीच्या सभामंडपाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सुशोभित मखरात इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री पावणाई देवीच्या चांदीच्या उत्सवमूर्ती बसविल्या जातात. या उत्सव मूर्तींसमोर पुन्हा गोंधळी व घडशी यांचे सुश्राव्य गायन-वादन होते. त्यानंतर रात्री १ वाजेपर्यंत किर्तनाचा कार्यक्रम होऊन आरतीने रोजच्या कार्यक्रमांची सांगता होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीपासून सांगता होईपर्यंत गणवेशातील पहारेकऱ्यांचा देवासमोर खडा पहारा असतो. उत्सवकाळातील राजेशाही थाटात साजरे होणारे सर्वच कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. (प्रतिनिधी)साळशी येथील सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वळई गावातून आम्ही गेल्या चार पिढ्या पावणाई देवीच्या सेवेला येतो. यापूर्वी माझे आजोबा, वडील येत होते. आता मी व माझा मुलगा नितीन धुमाळ १९८० पासून येतो. विजयादशमीदिवशी देवस्थानकडून साडी, ओटी, बिदागी देऊन आम्हाला सन्मानित करण्यात येते. या देवस्थानच्या कृपेमुळे आमची दिवसेंदिवस भरभराट झाली आहे.- पंडित जयसिंग तुकाराम धुमाळ, घडशी, ज्येष्ठ शहनाई वादक
साळशी येथील पालखी मिरवणूक सोहळा
By admin | Published: October 18, 2015 10:11 PM