वैभववाडी : पाणीटंचाई आराखड्यातील एकाही कामाचे बह्ण पत्रक अद्याप उपलब्ध झाले नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यावर ह्यमार्च महिना संपायला आला. तरी तालुक्याच्या टंचाई आराखड्यातील ११० पैकी १० सुद्धा कामांना मंजुरी मिळत नसेल तर ही कामे पावसाळ्यात होणार का? मग दरवर्षी हे आराखड्यांचे नाटक हवे कशाला? अशा शब्दांत सभापती लक्ष्मण रावराणे यांनी प्रशासनाच्या कारभारावर पंचायत समिती सभेत नाराजी व्यक्त केली.वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपसभापती हर्षदा हरयाण, सदस्या दुर्वा खानविलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील आदी उपस्थित होते.तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईबाबत सभेत चर्चा झाली.
त्यावेळी मागील वर्षातील टंचाईच्या कामांची स्थिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता एम. जे. वळंजू यांनी सांगितली. त्यावेळी सभापती रावराणे यांनी यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईची तीव्रता अधिक असणार आहे. त्यामुळे यावर्षी पाठविलेल्या आराखड्यातील सध्या किती कामांना मंजुरी मिळाली आहे? असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला.त्यावेळी तालुक्याच्या आराखड्यात ११० कामांचा समावेश आहे. त्यापैकी तीव्र टंचाईच्या ६२ वाड्यांचे प्रस्ताव अंदाजपत्रकासह पाठविण्यात आले आहेत. परंतु त्यापैकी एकाही कामाचे बह्ण पत्रक प्राप्त झाले नसल्याचे वळंजू यांनी स्पष्ट केले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीमुळे सभापती रावराणे यांनी पाणीटंचाईच्या बाबतीत प्रशासनाच्या भूूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुकीची आचारसंहिता या महिन्यात लागू होणार याची कल्पना असूनही टंचाई निवारणाच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. टंचाई आराखड्यातील कामे पावसाळ्यात होणार का? जनतेला गरजेच्या वेळी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नसेल तर दरवर्षी आराखड्यांचे नाटक हवे कशाला? असा संतप्त सवाल सभापतींनी उपस्थित केला.पंचायत समिती इमारतीच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा मागील सभेतील सूचनेच्या संदर्भाने पुन्हा चर्चेला आला. त्यावेळी ठेकेदाराचे थकित देयक देऊन झाले. मग आता अडले कुठे? अशी विचारणा सभापती रावराणे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यावेळी आम्ही मागच्या सभेनंतर ठेकेदाराला पत्र दिल्यावर चार दिवस काम सुरू होते. पुन्हा बंदच आहे, असे शाखा अभियंता पद्माकर चांडके यांनी सांगितले. त्यांच्या खुलाशावर उपसभापती हर्षदा हरयाण यांनी ह्यकाम कधी सुरू होते? असा प्रश्न केला.नगरपंचायतीचे विषय यापुढे सभागृहात नकोतनगरपंचायतीच्या नळपाणी योजनेची विहीर कोसळल्यामुळे बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीला धोका उद्भवला आहे. त्यामुळे विहिरीचे तातडीने बांधकाम करा किंवा विहीरच पूर्णत: बुजवून टाका असे पत्र नगरपंचायतीला देण्यात आले होते. तसेच बालविकास प्रकल्प कार्यालय आणि पशुवैद्यकीय दवाखान्याला पाणीपुरवठा होत नसल्याबाबत नगरपंचायत प्रशासनास पंचायत समितीमार्फत पत्र दिले होते.
परंतु, दोन्ही मुद्यांबाबत नगरपंचायतीने पंचायत समितीला काहीही कळविले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सभागृहात सांगितले. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाकडून पत्राचे उत्तर मिळत नसेल तर त्यांचे विषय या सभागृहात नकोत. त्यांच्याशी परस्पर संपर्क साधा, असे सभापती लक्ष्मण रावराणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.