बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर टाकवाडी परिसरात सोमवारी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत हजारो काजू कलमे जळाली. महसूल यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.डिंगणे-टाकवाडी परिसरात काल रात्री उशिरा माळरानाला आग लागली. माळरानावर गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. या परिसरात डिंगणे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने काजू बागायती उभी केली आहे. ही काजू बागायत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिंगणे येथील शशिकांत पोखरे, सुगंधा पोखरे, वामन शिरोडकर, प्रभाकर शिरोडकर, एकनाथ सावंत, सोमा सावंत या शेतकऱ्यांच्या काजू कलम बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यामध्ये हजारे काजू कलमे तसेच इतर जंगली झाडे जळून खाक झाली. आग शेकडो एकर परिसरात पसरल्याने आग विझविणे स्थानिकांसाठी कठीण बनले. टाकवाडी, धनगरवाडी, भोमवाडी हा परिसर वस्तीपासून बराच दूर असल्याने आग लागल्याचे प्रथम लक्षात आले नाही.रात्रो उशिरा डिंगणे गावातील बापू सावंत, दिनेश सावंत, आत्माराम सावंत, फटू सावंत, जयेश सावंत, विलास सावंत, माजी पोलीस पाटील यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, सुदर्शन सावंत, सोमा सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळरानावर गवत असल्याने आगीने पूर्ण बागायतीला वेढले. आगडोंब उसळल्याने आग विझविणे अशक्य बनले. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझविण्यासाठी पाणी नेणे शक्य नव्हते. ग्रामस्थ रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान, गतवर्षी देखील याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल यंत्रणेकडून पंचनामा करण्यात येऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी याठिकाणी आग लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्र्रतिनिधी)हजारो काजू कलमे जळालीमंगळवारी सकाळी डेगवे तलाठी किरण गझीनकर, कृषी सहाय्यक ए. एल. परब, कोतवाल संतोष नाईक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला. मात्र, आगीत जळालेले क्षेत्र मोठे असल्याने पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या आगीत शेतकऱ्यांची हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंचनामा अद्याप सुरुच
By admin | Published: January 20, 2015 9:48 PM