सुधीर राणे
कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४२ व्या पुण्यतिथी महोत्सवास शुक्रवारपासून येथील आश्रमात भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.भालचंद्र महाराजांचा प्रत्येक उत्सव हा भक्तगणांसाठी चैतन्याची, आनंदाची आणि भक्तीची पर्वणीच असतो. शुक्रवारी पहाटे समाधीपूजन,काकड आरतीपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तांच्या गर्दीने फुलून गेले. बाबांच्या या उत्सवानिमित्त समाधीस्थळ फुलांनी तर परिसरात मंडप,विद्युतरोषणाईनी सजवण्यात आले आहे.सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान हा धार्मिक विधी काशिनाथ कसालकर यांनी सपत्नीक केला. यावेळी ब्रम्हवृंद व संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळुसकर, इतर सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील तीन दिवस हा विधी होणार आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भाविक कणकवलीत दाखल झाले आहेत . त्यांनी भालचंद्र महराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
तद्नंतर आरती व दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.दुपारपासून ४ वाजेपर्यंत विविध सुश्राव्य भजने झाली. सायंकाळी ४ वाजल्यानंतर ह.भ.प. कीर्तनचंद्र श्रेयस बडवे ,रा.पुणे यांचे 'नामदेवांना सद्गुगुरू दर्शन ' या विषयावर किर्तन झाले. या किर्तनालाही भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती.
यापुढील चार दिवस हा सोहळा असाच भावभक्तीची अनुभुती देणारा ठरणार असून या पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन भालचंद्र संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.